Pune News : आता विद्यापीठात बसमधून फिरा फुकट | पुढारी

Pune News : आता विद्यापीठात बसमधून फिरा फुकट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 411 एकरांच्या विस्तीर्ण परिसरात विखुरलेल्या विविध विभागांत कामानिमित्त येणार्‍या प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून पायपीट करत परीक्षा विभागासह विविध प्रशासकीय विभागांत जावे लागते. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने हा त्रास कमी केला आहे. विद्यापीठाने प्रवेशद्वारापासून मोफत बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

विद्यापीठाला दोन बस दत्तक मिळाल्या होत्या. त्या आता विद्यापीठ आवारात अधिक चांगल्या पद्धतीने नियमितपणे फिरू लागल्या आहेत. विद्यापीठाच्या सर्व प्रमुख विभाग व कार्यालयासमोर बसथांबे सुरू केले आहेत. त्यामुळे प्रवेशद्वारापासून सर्व ठिकाणी सहज पोहोचणे शक्य झाले आहे. रिक्षा उपलब्ध नसल्यास ज्येष्ठ नांगरिकांसह विद्यार्थी, पालकांना अनेक अडचणी येत होत्या. सकाळी 10.30 वाजता विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून बस प्रवाशांना घेऊन जाते.

पर्यावरण विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ थांबते. पुढे जयकर ग्रंथालय, रसायनशास्त्र विभागामार्गे परीक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र, विद्यापीठ मुख्य इमारत, तंत्रज्ञान विभाग, मुलींचे वसतिगृह, हेल्थ सेंटर, एमबीए विभाग, मुलांचे वसतिगृह आणि पुन्हा प्रवेशद्वाराजवळ या मार्गाने सायंकाळपर्यंत या बस फेर्‍या होतात.

विद्यापीठातर्फे येणार अ‍ॅप

विद्यापीठ प्रशासनातर्फे सध्या काही थांबे करण्यात आले आहेत. मात्र, त्यात वाढ करण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे बस नेमकी कुठे आहे. किती वेळात कोणत्या थांब्यावर पोहोचेल यांची माहिती व्हावी, यासाठी विद्यापीठातर्फे अ‍ॅप तयार केले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठात फिरणे आता ‘स्मार्ट’ होणार असल्याचे विद्यापीठातील अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button