Pune : शिक्रापूर येथील विश्रामगृहात सुविधांचा अभाव | पुढारी

Pune : शिक्रापूर येथील विश्रामगृहात सुविधांचा अभाव

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर येथील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात सुविधांचा अभाव आहे. परिसरात सर्वत्र कचर्‍याचे ढीग निर्माण झाल्याने येथे येणार्‍या पाहुण्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाटबंधारे विभागाचे (चासकमानचे) विश्रामगृह आहे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून या विश्रामगृहातील वीजजोड बिल भरले नसल्याने तोडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम सुरू असताना सुमारे वर्षभरापूर्वी जलवाहिनी फुटली होती, तेव्हापासून ते आतापर्यंत विश्रामगृहाचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. येथील स्नानगृह व स्वच्छतागृहाचे दरवाजे देखील नादुरुस्त अवस्थेत असून त्यांना कडी-कोयंड्याची देखील सोय नाही. विश्रामगृहातील बेड व बेडशीटचीही अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे येणार्‍या पाहुण्यांना विश्राम मिळण्याऐवजी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने मनस्ताप होत आहे.

याठिकाणी वीज नसल्याने येथे थांबण्याचा धोका कोणीच पत्करत नाहीत. येथे कर्मचार्‍यांची संख्यादेखील कमी आहे. विश्रामगृहाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे. पाटबंधारे विभागाने या बाबींची दखल घेऊन तातडीने थकीत वीजबिल भरून वीजजोड सुरू करून घेणे व विश्रामगृहाची डागडुजी करून सुधारणा करणे तसेच पाहुण्यांची गैरसोय होणार नाही यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.

शिक्रापूर येथील विश्रामगृहाचे 35 हजार रुपये वीजबिल थकीत असल्याने महावितरणने सुमारे दीड महिन्यापूर्वी वीजजोड तोडला आहे. वीज बिल भरण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने अद्याप बिल भरलेले नाही. थकीत बिलासाठी लवकरात लवकर पैशांची तरतूद करून कनेक्शन जोडून घेणार आहोत. कायमस्वरूपी नळ पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी नवीन जोडून मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
                                 – सुनील बिराजदार, अभियंता, पाटबंधारे विभाग, शिक्रापूर

Back to top button