Pune : सराफ व्यावसायिकाला लुटणारी टोळी जेरबंद | पुढारी

Pune : सराफ व्यावसायिकाला लुटणारी टोळी जेरबंद

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : शिवापूर (ता. हवेली) गावातील शिवापूर वाड्यावर यशवंत राजाराम महामुनी या सराफ व्यावसायिकाला दि. 5 नोव्हेंबर रोजी लुटले होते. स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांनी एक महिन्याच्या आत या घटनेचा छडा लावून दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याजवळ असलेला 6 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहित ऊर्फ बाबा प्रकाश साठे (वय 25, रा. अण्णा भाऊ साठे वसाहत, सहकारनगर, पुणे), निखिल भगवंत कांबळे (वय 28, रा. आई माता मंदिर लेन नंबर 6, बिबवेनगर, अप्पर, पुणे), नीलेश दशरथ झांजे (वय 25, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव झांजे, ता. वेल्हे) आणि शफिक मकसूद हावरी (वय 19, रा. नीलकमल सोसायटी, इंदिरानगर, कुंभारवाडा, पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. आणखी तीन आरोपी फरारी असून, त्यांचा शोध सुरू आहे.

दि. 5 नोव्हेंबर रोजी राजगड पोलिस ठाणे हद्दीतील शिवापूर (ता. हवेली) येथे रात्री 9 वाजेच्या सुमारास दुकानातील सोने-चांदीचे दागिने घेऊन यशवंत महामुनी हे घरी जात होते. या वेळी दोन पल्सर मोटरसायकलवरील अनोळखींनी महामुनी यांच्या तोंडावर स्प्रे मारून दागिने हिसकावून कोंढणपूरकडे पलायन केले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजगड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक महिन्याच्या आतच या आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.ही कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगडचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, अभिजित सावंत, पोलिस हवालदार प्रकाश वाघमारे, अमोल शेंडगे, सचिन घाडगे, राजू मोमीन, अतुल ढेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश तिगळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, मंगेश भगत, नीलेश शिंदे, दत्ता तांबे यांनी केली.

Back to top button