मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : शिरूरच्या पूर्व भागामध्ये उसाला ऊसतोडी मिळत नसल्यामुळे या भागातील शेतकरी हैराण झाले आहेत. चालू वर्षी घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू न झाल्यामुळे इतर तालुक्यांतील व जिल्ह्यातील कारखान्याच्या टोळ्या मर्यादित भागांमध्ये आल्या आहेत. शेतकरी आपल्याला ऊसतोडी मिळावी म्हणून शेतकी कार्यालयात जाऊन अधिकार्यांना 'साहेब आम्हाला टोळी कधी मिळणार', अशी विनवणी करू लागले आहेत. शिरूरच्या पूर्व भागामध्ये श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना, गौरी शुगर, अंबालिका शुगर, दौंड शुगर, व्यंकटेशर शुगरसह निराणी ग्रुपचा भीमा-पाटस आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आदी कारखान्यांच्या ऊस टोळ्या व हार्वेस्टर ऊस तोडण्यासाठी आले आहेत. या भागातील अनेक शेतकर्यांनी इतर साखर कारखान्यांमध्ये आपल्या उसाची नोंद केली आहे. परंतु, ऊस टोळ्या कमी असल्याचे शेतकी अधिकार्यांकडून शेतकर्यांना सांगितले जात आहे. वेळेमध्ये उसाचे गाळप झाले नाही, तर उसाच्या वजनामध्ये गट होत आहे. त्याचा नाहक भुर्दंड शेतकर्यांना सोसावा लागत आहे.