Pune Crime News : दिवसा घरफोड्या करणारा शेट्टी मैत्रिणीसह जाळ्यात | पुढारी

Pune Crime News : दिवसा घरफोड्या करणारा शेट्टी मैत्रिणीसह जाळ्यात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवसा घरफोड्या करणार्‍या एका सराईत चोरट्याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील रघुनंदन हॉल येथील सेवा रस्ता परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी हा मुंबई येथील रहिवासी असून, पुण्यात चोरी करण्यासाठी येत असल्याचे समोर आले आहे.

रोहित चेतन शेट्टी (27, रा. मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेट्टी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर घरफोडीचे 14 गुन्हे दाखल आहेत. शेट्टी याने चोरी केलेले दागिने त्याची मैत्रिण अलिझा सय्यद (22) हिच्याकडे विक्री करण्यासाठी दिले. त्यानुसार पोलिसांनी सय्यद हिलादेखील अटक केली. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी सांगितले, की नोव्हेंबर महिन्यात सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव भागात दिवसा घरफोडीची घटना घडली होती. तेव्हापासून पोलिस आरोपींच्या मागावर होते.

तांत्रिक तपासावरून आरोपी हा मुंबई – बंगळुरू महामार्गावरील रघुनंदन हॉल परिसरात असल्याची माहिती पोलिस कर्मचारी सागर शेडगे, देवा चव्हाण, अविनाश कोंडे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून शेट्टीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.पोलिसांनी मुंबई येथे जाऊन 3 लाख 20 हजार रुपये किमतीचे 9 तोळे दागिने जप्त केले. शेट्टी हा दिवसा घरफोड्या करण्यात तरबेज आहे.

चोरी केलेला मुद्देमाल हा तो विल्हेवाट लावण्यासाठी मैत्रिणीकडे देत होता. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे निरीक्षक जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, अमोल पाटील, विकास बांदल, विकास पांडुळे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा

Back to top button