महापुराने दरवर्षी होणार्‍या नुकसानीला जबाबदार कोण? | पुढारी

महापुराने दरवर्षी होणार्‍या नुकसानीला जबाबदार कोण?

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महामार्गाची भराव टाकून उंची वाढवली, तर दरवर्षी निम्मे कोल्हापूर पाण्याखालीच जाणार आहे. यामुळे दरवर्षी होणार्‍या हजारो कोटींच्या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंगने केला आहे. याप्रश्नी जनरेटा उभारला पाहिजे, याकरिता पुढाकार घ्यावा, अशी विनंती असोसिएशनच्या वतीने दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शनिवारी करण्यात आली.

असोसिएशनच्या शिष्टमंडळाने डॉ. जाधव यांची भेट घेतली. कोल्हापुरात महापूर आल्यानंतर 2019 पासून असोसिएशनच्या वतीने याबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी देण्यात आली. पुणे-बंगळूर महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर पूरप्रवण क्षेत्रात उंची वाढली. त्यात भरच पडत असून, 2019 व 2021 साली आलेल्या पुरानंतर महामार्गाची उंची आणखी वाढवली जात आहे. ही उंची पिलर टाकून पूल उभारून वाढवावी, अशी मागणी असताना प्राधिकरण मात्र भराव टाकून उंची वाढवणार होते. यामुळे पंचगंगा नदीलगत एक मोठे धरण उभे राहील. त्यामुळे दरवर्षी निम्मे कोल्हापूर पाण्यात जाऊन हजारो कोटींचे नुकसान होण्याचा धोका असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी सांगितले. महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभाराचा पाढा वाचत गेल्या तीन वर्षांत जमा केलेली विविध कागदपत्रे, त्याविषयी माहितीही त्यांनी डॉ. जाधव यांना दिली.

टोल आंदोलनात दैनिक ‘पुढारी’ने जनआंदोलन उभे केले. कोल्हापूरकरांवर लादला जाणारा अन्यायी टोल जनआंदोलनाने रद्द झाला. याच पद्धतीने महामार्गावर उभारले जाणारे ‘धरण’ रद्द होईपर्यंत जनआंदोलन उभे राहावे आणि त्याचे नेतृत्व आपण करावे, अशी विनंतीही यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

यावेळी असोसिएशनचे सचिव राज डोंगळे, संचालक जयंत बेगमपुरे, विजय पाटील, प्रशांत काटे, निशांत पाटील आदी उपस्थित होते.
पिलर टाकून पूल उभारला जात नाही

तोपर्यंत पाठपुरावा करू : डॉ. जाधव
टोल प्रश्नापेक्षाही हा प्रश्न अधिक गंभीर आहे. भराव टाकून रस्ता उंच केला, तर दरवर्षी पूरपातळी वाढणार आहे. निम्म्यापेक्षा अधिक कोल्हापूर पाण्याखाली जाईल. पूर ओसरण्याचा कालावधीही अधिक राहणार आहे. परिणामी, सर्व स्तरावर नुकसान होणार आहे. हे कोल्हापूरकरांना परवडण्यासारखे नाही. याबाबत पिलर टाकून पूल उभारण्याचा निर्णय झाला असला, तरी प्रत्यक्षात हे काम सुरू होत नाही, तोपर्यंत याबाबत पाठपुरावा करू, असेही
डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सांगितले.

Back to top button