बारामतीत नणंद-भावजय की आत्या-भाचा; कोणती लढत होणार? | पुढारी

बारामतीत नणंद-भावजय की आत्या-भाचा; कोणती लढत होणार?

राजेंद्र गलांडे

बारामती : ‘बारामतीसह रायगड, शिरूर व सातारा या लोकसभेच्या जागा आमच्या पक्षाकडून लढविल्या जाणार आहेत,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 1) कर्जत येथील मेळाव्यात केली. त्यांच्या या घोषणेमुळे अजित पवार गटाकडून बारामती लोकसभेचा उमेदवार कोण? याची चर्चा आता रंगली आहे. गेले अनेक महिने नणंद-भावजय किंवा भाचा-आत्या असा सामना होणार असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात काय घडेल हे येत्या काही महिन्यांतच स्पष्ट होईल. बारामती लोकसभेसाठी (पान 1 वरून) अजित पवार गटाकडून पत्नी सुनेत्रा किंवा चिरंजीव पार्थ यांच्या नावाची चर्चा केली जात आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून गतनिवडणुकीत पार्थ पवार हे रिंगणात होते. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सुनेत्रा पवार यांना माहेरकडूनही राजकीय वारसा आहे. बारामतीत त्यांनी एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सामाजिक काम उभे केले आहे. बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्या माध्यमातून त्या सातत्याने जनतेपर्यंत जात आहेत. या दोघांपैकी एकाला संधी मिळणार, याकडे आता लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता बारामतीत अजित पवार यांनी सुळे यांच्याविरोधात स्वतंत्र उमेदवार दिला, तर सुळेंपुढील अडचणी कमालीच्या वाढतील.

बारामतीत सध्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा गट चाचपडतो आहे. जुन्या काही मंडळींना घेऊन ते बांधणी करत आहेत. परंतु, अजित पवार यांच्या प्राबल्यापुढे या गटाचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे बारामती तालुक्यातून सुळे यांना मताधिक्य कसे मिळणार? हा प्रश्नच आहे. होमपिचवरच त्यांना मताधिक्य मिळाले नाही, तर अन्य तालुके तरी साथ देतील का? हाही प्रश्न आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी आणखी काही धक्के बसणार असल्याचे बोलले जात आहे. पुढील चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत पवार कुटुंबाची रणनीती कशी असेल यावर सुळे यांचे भवितव्य अवलंबून असेल.

पक्षात फूट पडलेली असली तरी बहिणीसाठी भाऊ ऐनवेळी काहीही निर्णय घेऊ शकतो, असेही बारामतीत बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीला अद्याप चार ते पाच महिन्यांचा अवधी आहे. या कालावधीत अनेक घडामोडी घडतील. खुद्द सुळे या अजित पवार गटाकडून निवडणूक लढवतील, असेही बोलले जात आहे; परंतु सुळे यांनी गुरुवारीच ’बारामतीत सत्ता की संघर्ष, असे दोन पर्याय माझ्यापुढे होते. मी संघर्षाचा पर्याय निवडला आहे,’ असे सांगितले. त्यामुळे पुढे नेमके काय होते, यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागेल.

स्थिती अवघड

लोकसभा मतदारसंघात बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत. दौंडमध्ये भाजपचे आमदार राहुल कुल, पुरंदरला काँग्रेसचे आमदार संजय जगताप, भोरला काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, तर खडकवासल्यात भाजपचे आमदार भीमराव तापकीर कार्यरत आहेत. गत लोकसभा निवडणुकीत सुमारे सव्वा लाखांहून अधिक मताधिक्य सुळे यांना बारामतीतूनच मिळाले होते. या मताधिक्याच्या जोरावर आणि इंदापूर, पुरंदर, भोरने दिलेल्या साथीमुळे त्यांचा विजय झाला होता. लोकसभेचा त्यांचा दरवाजा बारामतीवर अवलंबून आहे. अजित पवार बरोबर नसल्याने बारामतीत स्थिती अवघड आहे.

हेही वाचा

Back to top button