औषधांचा वापर करताना काय काळजी घ्यावी? | पुढारी

औषधांचा वापर करताना काय काळजी घ्यावी?

डॉ. मनोज कुंभार

कोणतेही औषध आणल्यानंतर त्याचा वापर कशा प्रकारे करावा, ते कसे ठेवावे, त्याची स्वच्छता कशी बाळगावी याची माहिती असणे गरजेचे असते. बर्‍याच रुग्णांना औषधांचा वापर करताना त्यांच्या योग्य आणि सुरक्षित वापराबद्दल माहिती नसते. त्यामुळे औषधांचा अपेक्षित परिणाम दिसत नाही.

पूर्वी कुठल्या औषधाने किंवा अन्नाने रिअ‍ॅक्शन आली आहे का, आहारात कमी मीठ आणि कमी साखर हे पथ्य आपण पाळत आहोत का? महिलांनी आपण गरोदर आहोत का किंवा गरोदर राहण्याचा विचार आहे का या गोष्टींचे बरेच महत्त्व औषध घेताना असते. कारण गरोदरपणी काही विशिष्ट औषध घेतल्यास बाळात जन्मजात व्यंग किंवा बाळाच्या इतर तक्रारी निर्माण होऊ शकतात. म्हणून डॉक्टरांना पूर्ण माहिती द्यावी. ज्या स्त्रिया बाळाला स्तनपान करत आहेत त्यांनीही कोणतेही औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा; अन्यथा काही औषधे दुधाद्वारे बाळाच्या पोटात जातात आणि त्याचे परिणाम बाळावर होऊ शकतात. डॉक्टरांकडून कोणतेही औषध घेताना सध्या इतर औषधे किंवा आहाराला पूरक असणार्‍या काही पावडर घेत आहोत का याबाबतची माहिती द्यावी.

औषध घरी आणल्यानंतर ते योग्य प्रकारे ठेवणेदेखील महत्त्वाचे असते. औषधांची जागा मुलांपासून लांब असावी. औषधांचे जे मूळ कंटेनर किंवा बाटली आहे त्यामध्ये औषधे ठेवावीत. उष्णता किंवा थेट सूर्यप्रकाश यापासून औषधांना लांब ठेवावे. कॅप्सूल किंवा इतर गोळ्या दमट जागी किंवा ओलसर जागी ठेवू नयेत. यामुळे औषधाचे विघटन होऊ शकते. औषधाच्या बाटलीत कापसाचा बोळा ठेवू नये. यामुळे त्यात ओलावा येऊ शकतो. औषधावर विशिष्ट सूचना लिहिली असल्याशिवाय औषधे फ्रीजमध्ये ठेऊ नयेत. आणलेली औषधे दीर्घकाळ वाहनात ठेऊ नयेत. मुदत होऊन गेलेली किंवा जी औषधे वापरली जाणार नाहीत अशी औषधे साठवून ठेऊ नयेत. तसेच फेकून दिलेली औषधे मुलांच्या हाती लागणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. वेगवेगळी औषधे एकाच कंटेनरमध्ये ठेऊ नयेत. तसेच औषधांवरील लेबलही काढू नये. त्यावर औषधांसंबंधीच्या सूचना असतात.

अंधारात किंवा अंदाजाने लेबल न वाचता कोणतेही औषध घेऊ नये. काही औषधे तुकडे न करता किंवा भुकटी न करता घ्यायची असतात, ती त्याच प्रकारे घ्यावीत. पातळ औषधे घेताना ठरावीक डोस अचूकपणे घेतला पाहिजे. त्यासाठी घरातील नेहमीच्या वापराच्या चमच्याने अंदाजे औषध घेऊ नये. त्यावर जे प्रमाण लिहिले आहे त्यानुसार सोबत दिलेल्या कॅपच्या सहाय्याने औषध घ्यावे. काही गोळ्या गिळताना त्रास होतो. अशा वेळी पर्यायी औषध विचारून डॉक्टरांच्या सल्ल्याने दुसरे औषध आणावे.
सर्दी किंवा तत्सम आजार झाल्यानंतर इनहेलर्स वापरले जाते. या इनहेलर्सच्या औषधांसोबत ज्या सूचना असतात त्या काळजीपूर्वक वाचाव्यात. इनहेलर्स वापरण्यापूर्वी त्याबाबत काही शंका असल्यास डॉक्टरांना माहिती विचारावी.

डोळ्यात टाकल्या जाणार्‍या आयड्रॉपच्या बाटलीचे टोक डोळ्यांच्या कडांना किंवा इतर कुठल्याही पृष्ठभागांना लावू नये. तसेच बाटलीचे झाकण घट्ट लावलेले असावे. यामुळे जंजूसंसर्ग होत नाही. आयड्रॉप टाकण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्यावेत. हीच काळजी नाकात टाकायच्या औषधाबाबतीतही घ्यावी. तसेच नाकात औषध टाकण्यापूर्वी नाक हळूच शिंकरून घ्यावे. नंतर उभ्याने किंवा बसून डोके मागे करून ड्रॉपरने प्रत्येक नाकपुडीत औषधाचे थेंब टाकावेत. डोके थोडा वेळ तसेच कलते ठेवावे. यामुळे संपूर्ण नाकपुडीत औषध पसरेल.

Back to top button