पुणे : पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवरून जात असलेल्या लष्करातील जवानाला तुमची गाडी पंक्चर दिसते सांगत समोरील पंक्चरच्या दुकानात जाण्यास सांगून तेथे गेल्यानंतर तेथील संगनमताने 16 पंक्चर असल्याचे सांगत त्यांनी फिर्यादी यांच्या दुचाकीच्या टायरचे नुकसान करून तब्बल 1600 रूपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आता पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आल्यानंतर लष्करात कार्यरत असलेले नरेश पाल (39, रा. विसावा कॉम्प्लेक्स, एअरफोर्स स्टेशन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी आरोपींवर संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 28 नोव्हेंबर रोजी नरेश पाल हे सकाळी अकरा वाजण्याच्या कमांड हॉस्पिटल येथे जात असताना रामवाडी जकातनाका ब्रिज जवळ ते त्याच्या दुचाकीवरून जात असताना त्याच्या मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी तुमच्या दुचाकीत हवा कमी असल्याचे सांगितले. त्यांना समोरील पंक्चर दुकानात जाण्यास सांगून पंक्चर दुकानावरील दोन अनोळखी व्यक्ती व त्या गाडीत हवा कमी आहे सांगणार्या आरोपी यांनी संगनमत करून फसवणूक करण्याच्या बहाण्याने नरेश यांच्या दुचाकीच्या टायरच्या तब्बल 16 पंक्चर काढून त्यांच्याकडून 1600 रूपये उकळले. त्यामुळे पंक्चर दुकानावरील तीन अनोळखी आरोपींविरोधात नरेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र आळेकर करत आहे.
संशयित आरेापींनी फिर्यादी यांना खोटे सांगून त्यांना पंक्चरच्या दुकानावर जाण्यास भाग पाडून त्याच्या दुचाकीच्या तब्बल 16 पंक्चर काढल्या. दरम्यान, काही वेळानंतर फिर्यादींना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात येत तक्रार केली आहे.
– रविंद्र आळेकर, सहायक पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे.
शहरात पंक्चरच्या नावाखाली हात चलाकी करून पैसे उकळणारे सक्रीय झाल्याचे या गुन्ह्यावरून समोर आले आहे. यापूर्वीही अशाच पध्दतीने पंक्चरच्या नावाखाली पैसे उकळल्याचा गुन्हा येरवडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांनीही अशा होणार्या फसवणूकीबाबत सतर्क राहीले पाहिजे.