

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : येत्या 9 डिसेंबरला इंदापूर येथे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमधील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी (दि. 30) ओबीसी बांधवांची बैठक पार पडली. या वेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीने विखे पाटील यांचा निषेध नोंदविण्यात आला.
या वेळी 'ओबीसी एकजुटीचा विजय असो', 'एकच पर्व ओबीसी सर्व', 'छगन भुजबळसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है', 'राधाकृष्ण विखे पाटलांचा निषेध असो', अशा घोषणादेखील देण्यात आल्या. दरम्यान, विश्रामगृहातील बैठकीत भुजबळ यांच्या जाहीर सभेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या वेळी तालुक्यासह परिसरातील ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने शहरातील प्रशासकीय भवनाजवळील भव्य प्रांगणात होणार्या जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहून एकजुटीने हा मेळावा यशस्वी पार पाडावा, असे आवाहन करण्यात आले.