Pune : अवकाळीने 11 हजार हेक्टरवरील पिके बाधित | पुढारी

Pune : अवकाळीने 11 हजार हेक्टरवरील पिके बाधित

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यांमुळे पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्यांतील सुमारे 19 हजार 773 शेतकर्‍यांच्या 11 हजार 227 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये भातपिकासह कांदा, बटाटा, भाजीपाला आदीसह ज्वारी, मका पिकांना फटका बसल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. जुन्नर तालुक्यास सर्वाधिक तडाखा बसल्याचे त्यांनी सांगितले. मागील तीन दिवसांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळीमुळे पिकांच्या 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचा हा नजरअंदाज अहवाल असल्याचे नमूद करून ते म्हणाले, 315 गावांतील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शिरूर वगळता अन्य आठ तालुक्यांतील काढणीच्या अवस्थेतील भातपिकाची हानी झालेली आहे. नुकसानग्रस्त प्रमुख पाच तालुक्यांत 850 हेक्टवरील भातपिकाचे नुकसान झाले असून, त्यामध्ये भोरमध्ये 12.45 हेक्टर, मुळशी 120 हेक्टर, मावळ 361 हेक्टर, हवेली 319 हेक्टर आणि वेल्हा 41 हेक्टरचा समावेश आहे.

आंबेगाव तालुक्यात 6 हजार 428 शेतकर्‍यांच्या 2 हजार 612 हेक्टरवरील कांदा, भाजीपाला, ज्वारी, बटाटा, भात व मका या पिकांचे नुकसान झाले आहे. जुन्नरमध्ये 4 हजार 817 शेतकर्‍यांचे 4 हजार 817 हेक्टरवरील कांदा, भाजीपाला, ज्वारी व भाताचे नुकसान झाले आहे. शिरूरमध्ये 6 हजार 130 शेतकर्‍यांचे सुमारे 2 हजार 824 हेक्टरवरील फळपिके, कांदा, भाजीपाला, ज्वारीचे नुकसान झाले आहे. तर खेडमध्ये 824 शेतकर्‍यांच्या 120 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. क्षेत्रीय स्तरावर पंचनामे करण्याचे काम सुरू असून, ते पूर्ण होताच नुकसानीचे नेमके क्षेत्र निश्चित होईल, असेही काचोळे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button