Pune : अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली | पुढारी

Pune : अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  जुन्नर तालुक्यात रविवारी (दि. 26) रात्री झालेल्या पावसामुळे तरकारी पिकांना मोठा फटका बसला. द्राक्ष पिकाची मोठी हानी झाली. पावसामुळे फूल व फळकुज होऊन फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. जुन्नरमध्ये मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्यात सुमारे चार हजार एकरावर द्राक्षबागा आहेत. ऑक्टोबरनंतर छाटणी झालेल्या द्राक्षबागा घडनिर्मिती, फुलोरा, घड निघण्याची अवस्था या तीन स्टेजमध्ये आहेत. याबाबत द्राक्ष उत्पादक अशोक जाधव म्हणाले, अवेळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान फुलोरा अवस्थेतील बागांचे होते.

फुलोरा अवस्थेतील घडात पाणी साठल्याने घडकूज होऊन हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. गुंजाळवाडी, पिंपरी पेंढार गोळेगाव, येडगाव या भागामध्ये द्राक्षाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पावसामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. फवारणीचा खर्च वाढणार आहे. अनेक द्राक्ष उत्पादकांनी भल्या सकाळीच फवारून केली. सोमवारी (दि. 27) दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. तालुक्यामध्ये हजारो हेक्टरवर कांदा लागवड सुरू आहे. या लागवडीवर पावसाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. कांद्यावर बुरशीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. काही भागांमध्ये कांद्याची लागवड लवकर झाल्याने कांदा काढणीचे काम सुरू आहे. पावसामुळे कांदा सडण्याची दाट शक्यता आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत आले आहेत. यंदा द्राक्षाचे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बाजारभाव वाढतील, असे द्राक्ष उत्पादक गुलाब नेरकर यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button