

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढते आहे. बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करतोय बिबट्या मानवावर हल्ला करतोय, बिबट्या दिवसाढवळ्या लोकांना दिसतोय. आता तर थेट बिबट्या गृहरचना सोसायटीमध्ये सावजाच्या शोधात शिरला आहे. आळेफाटा येथील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये रात्री दीडच्या सुमारास बिबट्या घुसला. या सोसायटीला कंपाउंड नाही त्यामुळे मोकाट कुत्री त्या ठिकाणी बसतात.
सावजाच्या शोधात बिबट्या थेट त्या ठिकाणी पोहचला. बिबट्याला पाहून कुत्री जिन्यांवरून टेरेसवर पळाली. बिबट्याही त्यांच्या पाठीमागे जिन्यांनी वर चढत गेला परंतु बिबट्याला टेरेस न सापडल्याने बिबट्या पुन्हा खाली आला. बिबट्या सोसायटीमध्ये आल्यावर कुत्र्यांनी एकच कलगा केला परंतु ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे कोणालाही जाग आली नाही. तथापि सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे सकाळी बिबट्या सोसायटीत आल्याचा उलगडा झाला. मग मात्र सगळ्यांची एकच घाबरगुंडी उडाली. दरम्यान आळे परिसरामध्ये बिबट्यांची संख्या वाढत चाललेली असून या गृहरचना सोसायटी जवळ बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी आळे गावचे उपसरपंच अँड.विजय कुऱ्हाडे यांनी केली आहे.
हेही वाचा