नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : गावठी पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या ट्रकचालकास नारायणगाव पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी (दि. २४) रात्री हॉटेल गणपीर दरबारसमोरील कॅनॉलवर करण्यात आली. या कारवाईत ४ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
शफिक रफिक सय्यद (वय ४०, रा. मंगळवार पेठ, जुन्नर) असे जेरबंद करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा कंपनीचा एमएच १४ एचजी ७५७३ या ट्रकमधील चालक हा पिस्तुल बाळगत असल्याची माहिती बातमीदारामार्फत नारायणगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, गोरक्ष हासे व इतर सहकाऱ्यांनी हॉटेल गणपीर दरबारसमोरील कॅनॉलवर सापळा रचून ट्रकचालक शफिक सय्यदला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी एकूण ४ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फौजदार तावजी दाते हे पुढील तपास करत आहेत.
मागील ४ महिन्यांमध्ये नारायणगाव पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये ३ पिस्तुल, २ कोयते, एक तलवार जप्त करुन आरोपींना जेरबंद केले आहे.