

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी, बँड पथकाचे सुरेल वादन, विद्युतरोषणाईचा झगमगाट आणि दिव्यांच्या लख्ख प्रकाशात रविवारी शहरातील मंदिरे उजळली. निमित्त होते कार्तिकी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेचे. शहरातील मंदिरांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन केले होते आणि भाविकांनी एकत्र येत सकारात्मकतेचे दिवे प्रज्वलित केले.
त्रिपुरारीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन
रांगोळीच्या पायघड्या आणि मंदिर परिसरात लावलेल्या दिव्यांच्या प्रकाशाने एक वेगळेच वातावरण निर्मिले, तर काही ठिकाणी झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने पुणेकरांचे लक्ष वेधले. संस्था-संघटनांच्या वतीने सोसायट्यांमध्ये आणि ठिकठिकाणी दीपोत्सव आयोजिला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरांत त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विद्युतरोषणाईच्या झगमगाटाने, तर दीपोत्सवाच्या सोनेरी प्रकाशात आणखी भर घातली. मंदिरांमध्ये विधिवत पूजा झाल्यानंतर सायंकाळी सहानंतर दीपोत्सवाला सुरुवात झाली. खासकरून शिवमंदिरांमध्ये 'हर हर महादेव'चा जयघोष दुमदुमला.
रविवार पेठेतील श्री सोमेश्वर मंदिरही दिव्यांच्या प्रकाशात उजळले. मंदिरात पाण्यावर तरंगणार्या फुलांचा गालिचा साकारला होता. सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपती मंदिरामध्येही भाविकांनी दर्शन घेतले. येथे अन्नकोटाचे आयोजन केले होते. दीपोत्सवामध्ये दिव्यांच्या प्रकाशात परिसर उजळले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही दीपोत्सवाचे आयोजन केले होते.
पुणेकरांनी घेतला फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद
श्री ओंकारेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले होते आणि भाविकांची दर्शनासाठी मंदिरात सायंकाळी गर्दी झाली. भाविकांनी एकत्र येऊन दिवेही प्रज्वलित केले. तसेच शंखनादाने वातावरणात चैतन्य निर्माण केले. नटरंग अकादमी पुणे यांच्यातर्फे शिवस्तुती आणि शिव तांडवनृत्य सादर करण्यात आले आणि या नृत्याने पुणेकरांची मने जिंकली. त्यानंतर मंदिराच्या मागील गच्चीवर त्रिपुरासूर दहन करण्यात आले. पावसाच्या सरीतही त्रिपुरासूर दहन पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आणि यानिमित्ताने झालेल्या नयनरम्य फटाक्यांच्या आतषबाजीचा त्यांनी आनंद घेतला.
महालक्ष्मी मंदिरात विलोभनीय दृश्य
प्रभू श्री रामांची चित्ररंगावली… विविधरंगी पणत्यांसह दिव्यांची आकर्षक आरास… नानाविध फुलांची सजावट व विद्युतरोषणाईने उजळलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराचे विलोभनीय दृश्य त्रिपुरारी पौर्णिमेला पाहायला मिळाले. जय श्रीराम… श्री महालक्ष्मीमाता की जयच्या नामघोषात 11 हजार पणत्यांचा दीपोत्सव मंदिरांमध्ये करण्यात आला. श्री. बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले आदी उपस्थित होते.