दुर्दैवी : गुरे चारायला गेलेल्या विद्यार्थिनीचा पाझर तलावात बुडून मृत्यू | पुढारी

दुर्दैवी : गुरे चारायला गेलेल्या विद्यार्थिनीचा पाझर तलावात बुडून मृत्यू

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : गुरे चारायला डोंगर परिसरात गेलेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. खेड तालुक्यातील आदिवासी परसुल गावात दि. २१ नोव्हेंबर रोजी घडली. याबाबतची माहिती पोलिसांनी प्रसार माध्यमांना उशिरापर्यंत कळू न दिल्याने साशंकता व्यक्त केली जात आहे.

मोनिका सुरेश भवारी असे मयत मुलीचे नाव आहे. ती येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात इयत्ता ८ वी मध्ये शिकत होती. दिवाळीची सुट्टी असल्याने मंगळवारी (दि. २१) मोनिका जनावरे चारायला परसुल खोपेवाडी येथील डोंगर रानात घेऊन गेली होती. दिवसभर आजुबाजुच्या रानात जनावरे चरत होती. सायंकाळी जनावरे चरुन घरी आली; मात्र मोनिका भवारी घरी आली नाही.

तिच्या घरच्यांनी रात्री परीसरात जाऊन शोध घेतला असता तलावाच्या काठावर चप्पल आणि जर्किन आढळुन आले. अशाही परीस्थितीत तलावातील स्थानिक नागरिकांनी मिळुन पाण्यात शोध घेतला. तपास न लागल्यामुळे याची खबर खेड पोलिसात देण्यात आली. त्या नंतर बुधवारी (दि. २२) सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तलावातुन तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचानामा करुन शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

दरम्यान खेड पोलिसांच्या वतीने ही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. एरव्ही पोलिसांकडून किरकोळ चोऱ्या, मोटारसायकल चोरी, रस्त्याच्या कडेला पण वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या ग्रुपवर टाकण्यात येते. परंतु ही घटना सांगण्यात आली नाही.

हेही वाचा

शिक्षण : समूह विद्यापीठांनी काय साधणार?

टेक-इन्फो : ‘एआय’ कल्पित आणि वास्तव

रायगडचे सागर किनारे परदेशी पक्ष्यांनी बहरले

Back to top button