S T Strike : स्वारगेटमधून एसटीच्या गाड्या सोडण्याचा प्रयत्न, स्थानकात गोंधळ | पुढारी

S T Strike : स्वारगेटमधून एसटीच्या गाड्या सोडण्याचा प्रयत्न, स्थानकात गोंधळ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : S T Strike : एसटी प्रशासनाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास स्वारगेट स्थानकातून एसटीच्या गाड्या सोडण्याचा प्रयत्न केला. त्याकरिता प्रशासनाने बाहेरील पाच चालक आणले होते. असा आरोप एसटीच्या कर्मचार्‍यांनी केला आहे. दरम्यान एसटी प्रशासनाने यास नकार दिला आहे.

स्वारगेट एसटी स्थानक हे कर्मचार्‍यांच्या संपाचे केंद्रबिंदू बनले आहे. येथे संपात फूट पडल्यास राज्यभरातील संपाची उभी असलेली भिंत कोसळणार आहे. हे माहित असल्यामुळे मंगळवारी एसटीचे वरिष्ठ पातळीवरील अधिकारी स्वारगेट स्थानकात दाखल झाले होते. त्यांची सायंकाळच्या सुमारास येथील आगार व्यवस्थापक कार्यालयात बैठक झाली. पोलिस बंदोबस्तात येथून एसटीची गाडी सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. मात्र, ऐनवेळी स्थानकात येणारे आणि येथून एसटीची गाडी घेऊन जाणारे चालक गायब झाल्यामुळे एसटीच्या गाड्या सुटू शकल्या नाहीत.

एसटी कर्मचार्‍यांचा संप मोडण्यासाठी शासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून बाहेरील चालक आणून एसटीच्या स्वारगेट स्थानकातील गाड्या सोडण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. यामुळे एसटी कर्मचार्‍यांमध्ये मंगळवारी नाराजीचे वातावरण निर्माण झाले. तसेच, आम्ही या संपावर ठाम असून जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही. तोपर्यंत एसटी स्थानकातील गाडी चालविणार नाही, असे एसटी कर्मचार्‍यांनी यावेळी सांगितले.

काळेसाहेब हे स्वारगेट स्थानकात दौर्‍यावर आले होते. गाड्या सोडण्यासाठी कामगार हवेत. कामगारच नसल्यामुळे आम्ही गाड्या सोडणार कशा? त्यामुळे सध्यातरी आमचे गाड्या सोडण्याचे नियोजन नाही.
–  रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, एसटी पुणे विभाग

Back to top button