शेळगाव येथे उद्यापासून श्रीसंत मुक्ताबाई यात्रेला प्रारंभ | पुढारी

शेळगाव येथे उद्यापासून श्रीसंत मुक्ताबाई यात्रेला प्रारंभ

शेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  लाखो भाविकांचे श्रद्धज्ञास्थान असलेले व धाकटे पंढरपूर म्हणून संबोधले जाणार्‍या तीनशे वर्षांपूर्वीचे संजिवन समाधीस्थळ असलेल्या शेळगाव (ता. इंदापूर) येथील श्री संत मुक्ताबाईच्या पाच दिवसीय यात्रोत्सवाला शनिवार, दि. 25 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर बुधवारी (दि. 29) सांगता होणार आहे. यात्रेसाठी ग्रामपंचायत प्रशासन, यात्रा उत्सव कमिटी व ग्रामस्थ सज्ज झाले आहेत अशी माहिती सरपंच उर्मिला लक्ष्मण शिंगाडे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सोपान माने व ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी दिली.

मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी शनिवारी (दि. 25) श्रींची पालखीमधून गावातून मिरवणूक निघणार आहे. दुसर्‍या दिवशी रविवारी (दि. 26) पारंपरिक वाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत 300 वर्षांपूर्वीच्या बि—टिशकालीन रथातून श्रींची मिरवणूक निघणार आहे. तिसर्‍या दिवशी शनिवारी (दि. 27) पहाटे श्रींंची महापूजा व अभिषेक होणार आहे. रात्री 8 वाजता श्री संत चोखामेळा महाराज मंदिरात ह. भ. प. सुमन महाराज तरडे यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर श्रींचा छबीना, दहीहंडीचा कार्यक्रम, शोभेचे दारूकाम होईल. रात्री यात्रेकरूंसाठी तुकाराम खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम होईल.
तर मंगळवारी (दि. 28) यात्रेच्या मुख्य दिवशी दिवसभर मंदिरात शास्त्रीय संगीत भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर

दुपारी 2 वाजल्यापासून कुस्तीचा आखाडा होईल. सायंकाळी मालती इनामदार यांच्या लोकनाट्य तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. बुधवारी (दि. 29) यात्रा बाजार व सायंकाळी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता होईल. दरम्यान यात्रेची तयारी पूर्ण झाल्याचे ग्रामपंचायत प्रशासन, यात्रा उत्सव कमिटी व ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button