Pune : मंचर-शिरूर रस्त्यावर वळणांवर गतिरोधकाची मागणी | पुढारी

Pune : मंचर-शिरूर रस्त्यावर वळणांवर गतिरोधकाची मागणी

मंचर : पुढारी वृतसेवा :  आंबेगाव तालुक्यातील मंचर-शिरूर रस्त्यावर अवसरी खुर्द व अवसरी बुद्रुक हद्दीत तीन ते चार ठिकाणी धोकादायक वळणे असून, तेथे वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी गावडेवाडीचे माजी सरपंच स्वरूपा ऋषिकेश गावडे यांनी केली. अवसरी फाट्यावरून वाहने निघाल्यानंतर एचपी पेट्रोलपंपाच्या दक्षिणेला एका जागेवर धोकादायक वळण आहे. तेथे रस्त्याच्या एका बाजूला शेती असून, त्यात कडवळ, मका ही पिके असल्याने समोरून येणारे वाहन लवकर दिसून येत नाही. अचानक ते समोर आल्यावर अपघात होत आहेत. या अपघातांत आतापर्यंत पाच ते सहा जणांचे बळी गेले आहेत.

संबंधित बातम्या :

पुढे बैलगाडा शर्यत घाटालगत धोकादायक वळण आहे. या ठिकाणीसुद्धा गतिरोधक, दिशादर्शक फलक उभारावा, अशी मागणी अवसरी खुर्दचे उपसरपंच अनिल शिंदे यांनी केली आहे. अवसरी बुद्रुक, मांदळे हॉस्पिटलजवळदेखील धोकादायक वळण आहे. या वळणावर एका बाजूला गावचा ओढा आहे. या ओढ्याला बाराही महिने थोड्याफार प्रमाणात पाणी असते. या ठिकाणीसुद्धा दोन वाहने अचानक समोर आल्यावर अपघात होत आहेत. दोन महिन्यांपूर्वी एक खडी वाहून नेणारा टेम्पो ओढ्याच्या पाण्यात गेला होता. नशीब बलवत्तर म्हणून चालक बचावला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक रस्त्यावरील धोकादायक वळणावर गतिरोधक टाकावेत, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर यांनी केली आहे.

 

Back to top button