Pune News : खोदकाम, बांधकाम, राडा-रोड्यामुळे प्रदूषणात भर | पुढारी

Pune News : खोदकाम, बांधकाम, राडा-रोड्यामुळे प्रदूषणात भर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात गेल्या पाच वर्षांत प्रचंड खोदकामांसह बांधकामे वाढली. मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून तर रस्त्यावरून जाताना वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. धुळीचे साम—ाज्य शहरात वाढले. तीस वर्षांत शहराचा विस्तार तब्बल 73 टक्क्यांनी वाढल्याने वाहतूक वाढली. पण रस्त्यांची रुंदी कमी पडू लागली. त्यामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पालिकेने मेट्रोच्या कामासह इतर बांधकामांनाही नोटिसा दिल्या. मात्र, त्यामुळे प्रदूषणाला आळा बसेल का, हा संशोधनाचा प्रश्न बनला आहे.शहराच्या वाढत्या प्रदुषणावर देशविदेशातील तज्ज्ञांनी शेकडो शोधनिबंध लिहिले आहेत. शहरातील तरुण वास्तुविशारद प्रतीक गावडे यांनी लिहिलेला शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला. त्यांनी केलेल्या शोधनिबंधात अनेक महत्त्वाच्या बाबी उघड केल्या. त्या डोळ्यात अंजन घालणार्‍या आहेत.
शहराचा विस्तार तीस वर्षांत 76.33 टक्क्यांनी झाला. 43 गावे शहराच्या हद्दीत विलीन झाल्याने  143 ते 331 चौरस किलोमीटर इतके शहर फुगले. त्यामुळे बाहेरील लोकांचे शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर वाढले. वाहतूक 106 पटींनी वाढली. पण रस्त्याचे जाळे फक्त 6 पटींनी वाढल्याचा दावा गावडे यांनी शोधनिबंधात केला आहे. गावडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, त्यांचा शोधनिबंध बोलका आहे.

43 गावे विलीन झाल्याचा परिणाम

खराब सार्वजनिक वाहतूक. त्यात लोकसंख्या तीन दशकांच्या कालावधीत 73.36 टक्क्यांनी वाढली आहे आणि शहराचा विस्तार 146 ते 331 चौरस किलोमीटरने झाला. प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) शहराच्या आजूबाजूची 43 गावे विलीन झाल्यामुळे वाहनसंख्या वाढली आणि शहराचे पर्यावरण राखण्यात महापालिकेसारख्या यंत्रणा कमी पडल्या.

वाहतुकीमुळे मृत्युदर वाढला

लोकसंख्येतील झपाट्याने होणारी वाढ 2015 मध्ये शिगेला पोहोचली. शहराच्या स्फोटक वाढीमुळे खराब रस्तेजोडणी, वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन अशा समस्या सतत निर्माण होत आहेत आणि शहराच्या परिघात असलेल्या भागात अपुरा पाणीपुरवठा. ही पुण्यात सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. आता पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मृत्युदर दिवसाला एक व्यक्ती किंवा दरआठवड्याला 10 ते 15 लोकांचा आहे. जो शहराच्या गोंधळलेल्या बेशिस्त वाहतुकीमुळे खूप जास्त आहे.

वाहतूक फुगली, रस्ते अरुंद झाले

गेल्या 40 वर्षांपासून पुण्याचा दशकीय विकास दर सरासरी 40 टक्के इतका आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास 2031 पर्यंत लोकसंख्या 60 ते 70 लाखांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. पुणे हे एक महत्त्वाचे शहर म्हणून विकसित झाले. त्यामुळे अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल कंपन्यांना ते आकर्षति करत आहेत. उत्पादन कारखाने, स्थानिक उद्योगाचा बराचसा विस्तार झाला. कमी कालावधीत इन्फोटेक आणि कम्युनिकेशन वाढले. वाहतूक 105 पटीने वाढली आहे. पण, रस्त्यांचे नेटवर्क फक्त 6 पटीने वाढले.

महापालिकेचा निधी इकडे वापरा…

औष्णिक ऊर्जा आणि कोळसा खाण प्रकल्पांसाठी भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीचे सदस्य, पर्यावरणतज्ज्ञ प्रा. डॉ. उमेश कहाळेकर यांनी मेल पाठवून या मालिकेबद्दल  दैनिनक पुढारीचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, खराडी ते वाघोली दरम्यानचा परिसर जास्त प्रदूषित आहे. कारण या भागात जड वाहतूक आणि बांधकाम आणि  कचरा वाहून नेणारी वाहने आहेत. बांधकाम आणि विध्वंसाचा कचरा वाहून नेणारी वाहने ताडपत्रींनी झाकलेली असणे आवश्यक आहे.
ती रिकामी केलेली वाहने पाण्याने स्वच्छ केली जावीत. अशा वाहनांतून वाळू आणि काजळीचे कण खाली पडल्याने अपघात आणि वायू प्रदूषणही होऊ शकते. रस्त्यांच्या दुभाजकांजवळ भरपूर धूळ साचलेली दिसते. अशी धूळ वायुप्रदूषणासही कारणीभूत आहे. यांत्रिक स्वाइपिंग मशीन वापरून अशी धूळ नियमितपणे काढली पाहिजे. नॅशनल क्लीन एअर मिशनअंतर्गत महापालिकेला मिळालेला निधी त्यासाठी वापरला पाहिजे. वाहतूक सुरळीतपणे चालविण्यासाठी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या रस्त्यावर उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावेत.
पुणे महापालिका वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना करीत आहे. रस्त्यावरच्या धुळीबाबत आम्ही मेट्रो प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बांधकामाच्या भोवती पत्रे, नेट लावणे तसेच पाण्याचे स्प्रिंकलर लावणे या बाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रदूषणात नक्कीच घट होईल. यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे.
-मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, पुणे महापालिका.
केवळ वाहन प्रदूषण हे शहरात वाढलेल्या प्रदूषणाचे कारण नाही. शहरात अलीकडच्या काळात गल्ली बोळात मोठी खोदकामे, बांधकामे वाढली. त्याची मोठी भर हवा प्रदूषणात झाली आहे. रस्त्यावरची धूळ हे एक मोठे कारण आहे.
-डॉ.बी.एस.मूर्ती,  संचालक सफर संस्था
 महापालिकेने नुकतेच गॅझेट प्रसिद्ध केले आहे. आत्तापर्यंत आमच्या बांधकामाच्या साइटवर पत्रा लावण्याची उंची 15 फूट एवढी होती, ती आता 25 फूट एवढी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे तेवढी उंची आम्ही वाढवली आहे. तसेच हिरव्या रंगाच्या जाळ्या बांधकामाच्या ठिकाणी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.  त्या आम्ही लावतो आहोत. तसेच बांधकामाचे ठिकाणच्या गाड्या वेळोवेळी घेऊन बाहेर काढाव्यात, अशा सूचना दिलेल्या आहेत. त्या सर्वांची अंमलबजावणी आम्ही आमच्या संघटनेतर्फे करण्याचा निर्णय घेतला आहे.
-नंदू घाटे, अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यवसाय संघटना, पुणे
हेही वाचा

Back to top button