उसतोडीमुळे बिबटे सैरभैर ; ऊसतोड कामगार, मेंढपाळांमध्ये प्रचंड भीती | पुढारी

उसतोडीमुळे बिबटे सैरभैर ; ऊसतोड कामगार, मेंढपाळांमध्ये प्रचंड भीती

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या एक महिन्यापासून ऊसतोड सुरू झाली आहे. ऊसतोडीमुळे बिबट्यांना लपन जागा राहिली नसल्याने ते सैरभैर झाले आहेत. दिवसाढवळ्या बिबटे आणि बछड्यांचे दर्शन होत आहे. यामुळे ऊसतोड कामगारांसह धनगर-मेंढपाळ आणि शेतकरी देखील धास्तावले आहेत. आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग हा बिबटप्रवण क्षेत्रात येतो. या भागातील पारगाव, शिंगवे, वळती, नागापूर, रांजणी, थोरांदळे ही गावे विघ्नहर, भीमाशंकर या सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येतात.

हा परिसर घोड व मीना नद्यांच्या पात्रांमुळे बागायती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उसाला बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकरी ऊसपिकाकडे अधिक वळले आहेत. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे. बिबट्यांची लपन जागा हे ऊसपीकच असल्याने या परिसरात बिबट्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मागील एक महिन्यापासून या दोन्ही साखर कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे ऊसतोड वेगात सुरू झाली आहे. परिणामी, बिबट्यांना लपन जागा राहिली नसल्याने ते सैरभैर झाले आहेत. दुचाकींचा पाठलाग करणे, शेळ्या-मेंढ्यांवर हल्ला करणे या घटना तालुक्यातील गावांमध्ये नित्याच्याच बनल्या आहेत. आता ऊसतोडीमुळे बिबट्यांचे शेतकर्‍यांना दर्शन होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात पिकांना पाणी देणे शेतकर्‍यांना कठीण बनले आहे.

Back to top button