Pune Crime News : कुत्र्याचा गळफासाने मृत्यू; डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा | पुढारी

Pune Crime News : कुत्र्याचा गळफासाने मृत्यू; डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लसीकरणासाठी पेट क्लिनिकमध्ये आणलेल्या कुत्र्याचा गळफास लागून मृत्यू झाल्याप्रकरणी दोघा डॉक्टरासंह चौघांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पाषाण येथील विगल्स माय पेट क्लिनिकमध्ये घडली. याप्रकरणी बाणेर-पाषाण लिंक रोड येथील 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी डॉ. संजीव राजाध्यक्ष (वय 60), डॉ. शुभम राजपूत (वय 35) आणि दोघे अनोळखी व्यक्ती, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींकडे हनी नावाचा लॅब—ोडोर जातीचा कुत्रा होता. त्याचे वार्षिक लसीकरण आणि नेल्स ट्रीमिंग करण्यासाठी विगल्स माय पेट क्लिनिकमध्ये घेऊन गेले होते. फिर्यादींनी कुत्र्याला डॉक्टरांच्या ताब्यात दिले होते.

डॉ. राजपूत आणि त्यांच्या दोघा मतदनिसांनी कुत्र्याला त्यांच्याकडील पट्ट्याने झाडाला बांधण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, राजपुत यांनी लावलेला पट्टा हा श्वानाच्या गळ्याला घट्ट झाला. त्यामुळे कुत्रा खाली कोसळला. त्याला उपचारांसाठी डॉक्टर क्लिनिकमध्ये घेऊन गेले. त्यानंतर पंधरा मिनिटांनी डॉक्टरांनी फिर्यादींना त्यांच्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

त्यानंतर दोन्ही डॉक्टर कुत्र्याच्या मृत्यूबाबत फिर्यादींना काही न बोलता तेथून पसार झाले. फिर्यादींचा कुत्रा चाळीस दिवसांचा असल्यापासून तो बारा वर्षांचा होईपर्यंत त्यांच्याकडे होता. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी चतुःशृंगी ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.

हेही वाचा

Pune News : आता घ्या मनपसंत, नोकरी देणारे शिक्षण

हवा प्रदुषणाने वाढले सर्दी , खोकला, तापाचे रुग्ण

सतलज नदीत संशोधकांना सापडला अत्यंत दुर्मीळ धातू!

Back to top button