Leopards Story : गंध, श्रवण अन् दृष्टिज्ञानात बिबट्या वाघ, सिंहापेक्षा सरस | पुढारी

Leopards Story : गंध, श्रवण अन् दृष्टिज्ञानात बिबट्या वाघ, सिंहापेक्षा सरस

आशिष देशमुख

पुणे : बिबट्या हा वाघ सिंहाच्या तुलनेत अत्यंत चपळ अन् प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढणारा प्राणी आहे. तो रात्रीच्या अंधारात शिकार करतो. कारण, त्याच्या डोळ्याच्या पडद्यावर पेंटम लुसिडम नावाचा थर असल्याने त्याला रात्रीही स्पष्ट दिसते. गंध, श्रवण आणि दृष्टिज्ञानात बिबट्या इतर प्राण्यांपेक्षा सरस आहे. वाघ, सिंहाच्या तुलनेत बिबट्याने स्वतःला शंभरपटींनी बदलले आहे. त्यामुळेच तो केवळ जगला नाही, तर त्याची संख्या झपाट्याने वाढत आहे.

बिबट्या हा वाघ आणि सिंहापेक्षा अतिशय वेगळा असून, त्याने जगण्यासाठी खूप संघर्ष करून स्वतःला बदलले आहे. वाटेल ते खाऊन जगणे ही त्याची सवय वाघ, सिहांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांची संख्या मर्यादित आहे. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढणे या स्वभावामुळे बिबट्या केवळ जगला नाही, तर त्याची संख्याही प्रचंड वेगाने महाराष्ट्रात अन् भारतातही वाढत आहे. त्यातही जुन्नर तालुक्यामध्ये तो सर्वाधिक संख्येने वावरतो आहे.

आता बिबट्या आणि माणसातला संघर्ष या भागात टिपेला पोहचला असून, या बिबट्यांचे करायचे काय? असा प्रश्न शासनासह सामान्य माणसालाही प्रश्न पडला आहे. त्याच्या डोळ्यांच्या पडद्यावर पेंटम लुसिडम थर असल्याने त्याला अंधुक आणि रात्रीच्या अंधारात देखील स्पष्ट दिसते. बिबट्याला गंध, श्रावण आणि दृष्टीचे ज्ञान अतिशय चांगले असल्याने तो शिकार करण्यात सर्वांत पुढे आहे. त्यामुळे तो कधीही उपाशी राहत नाही.

डॉक्टरांनी सांगितली रंजक माहिती…

या ठिकाणी कायमस्वरूपी दोन डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांच्याशी आम्ही गप्पा मारल्या तेव्हा त्यांनी अतिशय रंजक माहिती बिबट्याबद्दल सांगितली. डॉ. चंदन सवणे व डॉ. आश्विन ढगे हे दोन वन्यजीव डॉक्टर सोबत काम करतात. वाईल्ड लाईफ एसओएस या संस्थेच्या वतीने हे डॉक्टर या केंद्रात कार्यरत आहेत.

त्यांनी सांगितले की, बिबट्याला गंध, श्रवण आणि दृष्टिज्ञान हे वाघ व सिंहापेक्षा चांगले आहे. शिकार टप्प्यात आणण्यासाठी तो या तिन्ही ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून झडप घालतो. वाघ-सिंह हे मोठी शिकार मिळाली तरच खातात, नाहीतर उपाशी राहतात. मात्र, बिबट्यांचे तसे नाही, तो अगदी किडे खाऊन देखील जगतो. तो अत्यंत भित्रा प्राणी आहे, त्यामुळे तो शिकार लपविण्याचा खूप प्रयत्न करतो.

इथे आहे अद्ययावत प्रयोगशाळा…

माणिकडोहच्या रेस्क्यू सेंटरमध्ये एक छोटेसे रुग्णालय बिबट्यांसाठी सन 2022 मध्ये बांधण्यात आले. याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाल्याची कोनशिला तेथे लावण्यात आली आहे. इथे एक अनॅलिटिकल लॅब आहे, यामध्ये बिबट्याची विष्ठा, लघवी आणि रक्ताची तपासणी केली जाते.

तो शक्यतो आजारीच पडत नाही…

भक्ष्य पकडताना तो त्याच्या वजनाच्या तिप्पट-चौपटही पकडू शकतो व त्याला झाडावर नेऊन लपवून तो खाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या डोक्याला, पाठीला, मेंदूला इजा होते त्या वेळी ते कायमस्वरूपी अधू होतात, त्यामुळे इथे त्यांच्यावर उपचार होतात. त्यांना आम्ही कधीही बाहेर जंगलात पुन्हा सोडत नाही. त्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन होते, ते आजारीही पडतात; परंतु त्यांच्यावर उपचाराची गरज भासत नाहीत.
त्यांनाही होते अ‍ॅसिडिटी..

बहुतांश वेळा ते स्वतःच बरे होतात. बिबट्यांना अ‍ॅसिडिटीही होते, त्यावेळी ते गवत खाऊन स्वतःची ट्रीटमेंट स्वतःच करतात. बिबट्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब असे त्रास होत नाहीत. हे त्रास झाले तर ते जंगलात राहू शकत नाहीत. आजारी पडणे हे बिबट्याला परवडणारे नाही. तो कधीही आजारी पडत नाही. आजारी पडलाच तर तो कोपर्‍यात पडून राहतो. अशावेळी इतर बिबटे त्याला मारून टाकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बिबटे स्वतःची काळजी स्वतः घेतात. डॉक्टर म्हणाले, कुत्रा चावल्यावर माणसाला जसे अँटिरेबीज इंजेक्शन दिले जाते तीच ट्रीटमेंट बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या माणसाला देतात.

‘री-युनियन’ न झालेल्या बिबट्यांना सांभाळावे लागते…

वन विभागाचे अधिकारी एक शब्द वारंवार वापरत होते. तो म्हणजे ‘री-युनियन…’ त्यांना या शब्दाचा अर्थ विचारला असता, त्यांनी सांगितले की, आई पिलांना सोडून गेली की ती पुन्हा भेटण्याची शक्यता कमी असते. बहुतांश वेळा ती पुन्हा पिलांना भेटत नाही, त्यामुळे त्यांना आम्ही एका कॅरेटमध्ये ठेवतो व त्याच्या आईला पुन्हा भेटवण्याचा प्रयत्न करतो. याला आम्ही आमच्या भाषेत री-युनियन म्हणतो. बहुतांश वेळा आई येत नाही. खूप कमी वेळा आई येते आणि पिलाला घेऊन जाते. आई पुन्हा आली नाही तर मात्र बिबट्या अगदी सामान्य मांजरासारखा राहून जीवन जगू लागतो. त्यामुळे री-युनियन झाले नाही तर तो बिबट्या अनाथ होतो. त्याला कायमचे रेस्क्यू सेंटरमध्येच राहावे लागते.

हेही वाचा

सनातन विचार सर्वांना जोडतो : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सवाई माधोपूरचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार?

कोल्हापूर : कुणबी नोंदी लोकांसाठी उपलब्ध होणार

Back to top button