पालखी मार्गाच्या कामासाठी पाणी चोरी; जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष | पुढारी

पालखी मार्गाच्या कामासाठी पाणी चोरी; जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष

संतोष ननवरे

शेळगाव : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात सध्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी निरा डावा कालव्यातून डिझेल, पेट्रोल वाहतूक करणार्‍या वाहनातून पाणी चोरी होत असल्याचा प्रकार मंगळवार (दि. 21) रोजी शेळगाव (ता. इंदापूर) तेलओढा येथे उघडकीस आला. सध्या पालखी मार्गाचे काम जोरात सुरू आहे.या कामासाठी पाण्याची आवश्यकता असते. परंतु, संबंधित ठेकेदाराकडून जलसंपदा विभागाची कोणतीही परवानगी न घेता निरा डावा कालव्यातून पाणी उचलले जात आहे. विशेष म्हणजे चक 25 ण 0604 या क्रमांकाच्या डिझेल व पेट्रोल वाहतूक करणार्‍या गाडीतून पाणी चोरी केली जात आहे.

विनापरवाना नीरा डावा कालव्यातून होत असलेल्या पाणी चोरीकडे जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. याबाबत काही तडजोडी झाल्यात का, अशी शंका आर्थिक हातमिळवणी करून सुरू आहे का, असा प्रश्नदेखील या भागातील शेतक-यांनी उपस्थित केला आहे. निरा डावा कालव्यातून पाणी चोरी करणार्‍या संबंधित ठेकेदारावर व पाणी चोरी प्रकरणाकडे दुर्लक्ष करणार्‍या जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकार्‍यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे. तेलओढा परिसरातील शेतकर्‍यांनी सांगितले की, निरा डावा कालव्यातून शेतकर्‍यांनी पाणी चोरी केली तर जलसंपदा विभाग त्यांच्यावर लाखो रुपयांचा दंड आकारून गुन्हा दाखल करते.

परंतु, याबाबत मात्र दुर्लक्ष केले जात आहे. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष घालून पालखी मार्गाच्या
कामात दिवसाढवळ्यात पाणी चोरी करणार्‍या संबंधित ठेकेदारावर व या कार्यक्षेत्रातील जलसंपदा विभाग अधिकार्‍यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या भागातील शेतक-यांनी केली आहे.

चौकशी करून गुन्हा दाखल करू
तेलओढा येथील निरा डावा कालव्यावरील पाणी चोरी प्रकरणी जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, पालखी मार्गाच्या कामासाठी निरा डावा कालव्यातून पाणी उचलण्याची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. सदर घटनेची तपासणी करून संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Back to top button