Pune News : कर्णबधिरता चाचणीबाबत प्रशासनाचे कानावर हात

Pune News : कर्णबधिरता चाचणीबाबत प्रशासनाचे कानावर हात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बाळाच्या जन्मानंतर बाळ बोलत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची चाचणी कुठे करायची, असा प्रश्न पालकांपुढे असतो. पुण्यासारख्या जिल्ह्यात ग्रामीण भागातील एकाही शासकीय रुग्णालायात कर्णबधिरता तपासण्याची यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यासाठी थेट औंध येथील जिल्हा रुग्णालय किंवा ससून रुग्णालयाव्यतिरिक्त पर्याय नाही. दरम्यान, ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ही तपासणी सुविधा असणे आवश्यक असल्याचे मत कान, नाक, घसा तज्ज्ञांनी व्यक्त केले.

बाळाची जन्मानंतर त्या बाळाची जन्मजात कर्णबधिरता तपासणी होणे आवश्यक असते. त्यासाठी ग्रामीण भागात सुविधाच उपलब्ध नाही. एक हजार मुलांमागे तीन ते चार मुलांना जन्मजात बहिरेपणा असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यासाठी बाळ जन्मल्यानंतर ऑटो ऑक्टोस्टोम इमिशन्स आणि दोन महिन्यांनंतर ब्रेनस्टेम इव्होक्ड रिस्पॉन्स ऑडिओमेट्री (बेरा) या दोन तपासण्या होणे अत्यंत गरजेचे आहे, असे ज्येष्ठ कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी सांगितले. मात्र, बहुतांश वेळा या तपासण्या केल्या जात नाही. तर पालकही याबाबत फारसे जागृत नसतात.

बाळ जन्मानंतर साधारणपणे पाच वर्षांच्या आतमध्ये त्याच्यावर उपचार केल्यानंतर चांगल्याप्रकारे परिणाम होतो. मात्र, अनेकदा पालक हे त्यानंतर डॉक्टरांकडे जाण्यासाठी धावपळ करतात. पालकांना कोणते उपचार किंवा कुठे उपचार घ्यायचे याची फारशी माहिती नसल्यामुळे वेळ निघून जाते आणि बाळाला आयुष्यभर बहिरेपणा घेऊन जगावे लागते. त्यासाठी राज्यासह देशातील हे प्रमाण कमी करण्यासाठी जन्मजात बाळांची तपासणी करणे आवश्यक आहे.

पुण्यात केवळ ससून रुग्णालय आणि औंध जिल्हा रुग्णालयात बहिरेपणा तपासणीची सुविधा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला तपासणीसाठी पुण्यात यावे लागते. खासगी रुग्णालयात जायचे म्हटल्यावर तपासणी आणि येण्या-जाण्याचा खर्च आठ ते दहा हजारांच्या पुढे जातो. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात तपासणी केंद्र सुरू झाले तर पालकांची फरफट थांबेल आणि बाळांचे तत्काळ निदान होईल.

– डॉ. अविनाश वाचासुंदर, ज्येष्ठ कान, नाक, घसा तज्ज्ञ

जिल्हा रुग्णालयामध्ये लहान बालकांच्या कानाच्या चाचण्या केल्या जातात. जिल्ह्यातील रुग्णांसाठी आरबीएसकेच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार करण्यात येतात.

– डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news