काळजीची बातमी ! जेजुरीवर पाणीटंचाईचे भीषण संकट

काळजीची बातमी ! जेजुरीवर पाणीटंचाईचे भीषण संकट

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  जेजुरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नाझरे धरणातील जलसाठा संपुष्टात आल्याने शहरावरील पाणीटंचाईचे संकट भीषण झाले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून जेजुरी एमआयडीसी, तसेच तातडीची मांडकी, डोह योजना, ऐतिहासिक पेशवे व होळकर तलावातून पाणी घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जेजुरीत दर वर्षी आठ यात्रा भरतात. वर्षभरात सुमारे पन्नास लाख भाविक येथे देवदर्शनासाठी येतात. शहराची लोकसंख्या 30 हजार असून, औद्योगिक क्षेत्रामुळे 6 ते 7 हजार कामगार येथे राहात आहेत. शहराला नाझरे धरणातून पिण्याचे पाणी दिले जाते. या धरणाची पाणीसाठा क्षमता 788 दशलक्ष घनफूट आहे, तर मृत साठा 200 दशलक्ष घनफूट आहे. यंदा परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने सध्या धरणात केवळ 97 दशलक्ष पाणीसाठा उरला आहे. यात गाळाचे प्रमाण मोठे आहे. 15 डिसेंबरपर्यंत धरणातून पाणी उपलब्ध होणार आहे. पाणीसाठा घटल्याने शहराला चार दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत आहे.

संबंधित बातम्या :

सन 2002 मध्ये पडलेल्या दुष्काळात शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी शासनाने 8 कोटी रुपये खर्चून वीर धरणाखाली असणार्‍या मांडकी डोहातून तातडीची पाणी योजना सुरू केली. काही वर्षे या दोन्ही योजनेतून शहराला पाणी पुरवठा केला जात होता. पुढे ही योजना नादुरुस्त झाली. वीजबिलाची थकबाकी वाढल्याने ही योजना बंद पडली. सध्याच्या दुष्काळी व पाणी टंचाईच्या काळात या योजनेची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. मोटार बसविण्याचे काम बाकी आहे. जेजुरी औद्योगिक वसाहतीला वीर धरणातून पाणीपुरवठा होतो. या योजनेतून पाणी घेण्यासाठी जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या योजनेतून केवळ दोन लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, पाण्याचा राखीव साठा म्हणून जेजुरीच्या ऐतिहासिक पेशवे व होळकर तलावातील पाणी शुध्दीकरण केंद्रात नेण्यासाठी पालिकेच्या वतीने जलवाहिनी टाकण्यात येत आहे. यासाठीचे खोदकाम सुरू करण्यात आले आहे. 15 डिसेंबर रोजी नाझरे धरणातील पाणीसाठा संपणार आहे. त्यानंतर पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होणार आहे. तातडीच्या मांडकी डोहातील पाणी योजना जेजुरी शहराला उपयुक्त ठरणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news