Leopards Story : नरभक्षक बिबट्यांना मिळतो कायमचा बंदिवास | पुढारी

Leopards Story : नरभक्षक बिबट्यांना मिळतो कायमचा बंदिवास

आशिष देशमुख

पुणे : जे बिबटे नरभक्षक झालेले असतात, ज्यांनी माणसांना जखमी केलेले असते किंवा शिकार केलेली असते अशा बिबट्यांना पकडून वनविभागाचे अधिकारी माणिकडोहच्या रेस्क्यू सेंटरमध्ये आणतात. त्या ठिकाणी त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवले जाते. तेथील डॉक्टर त्यांची दररोज तपासणी करतात. त्यांना पुन्हा कधी जंगलात सोडले जात नाही.

रेस्क्यू सेंटरमधील वनविभागाच्या अधिकार्‍यांनी अनाथ बिबट्यांची कहाणी सांगितली. प्रदीप चव्हाण हे वनाधिकारी चंद्रपूर येथून नुकतेच बदलून आले आहेत. त्यांनी सांगितले की, उसाच्या फडामध्ये बिबट्यांची मादी पिल्लांना जन्म देते तेव्हा अनेक वेळा ऊस काढणीच्या वेळीच इथे पिल्लांनी जन्म घेतला आहे हे तेव्हा आम्हाला समजते. एकदा ऊस काढणीला सुरुवात झाली की, आई तेथून पळून जाते.

भीतीपोटी ती पुन्हा येण्याची शक्यता खूप कमी होते. अशावेळी आम्ही त्या पिल्लांना एका कॅरेटमध्ये ठेवून पुन्हा त्या उसाच्या फडात नेऊन ठेवतो. कधी-कधी मादी येऊन पिल्लांना घेऊन जाते, पण अनेक वेळा मादी परत येतच नाही. त्यावेळी ती पिल्ले अनाथ होतात. ही पिल्ले नुकतीच जन्मलेली असल्याने त्यांना आईचे संस्कार मिळत नाहीत.

आईच असते त्यांची गुरू

आई संस्कार म्हणजे नेमके काय हे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले तेव्हा आमच्याही अंगावर रोमांच उभे राहिले..ते म्हणाले, पिल्लू अडीच वर्षांचे होईपर्यंत आई वेगवेगळ्या प्रकारची तंत्रे शिकवते. इतर प्राण्यांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा, शिकार कशी करायची, दबा धरून कसे बसायचे, झडप कशी घालायची.. ही सर्व तंत्रे ती अडीच वर्षांच्या पिल्लांना शिकवते. एकदा पिल्लं प्रशिक्षित झाली की मग मात्र ती त्यांना जंगलात एकटे सोडते. जेव्हा पिल्लं अनाथ होतात त्या वेळी आईचे कुठलेही संस्कार या पिल्लांवर होत नाहीत. तेव्हा हे पिल्लू अक्षरशः मांजरीसारखीच वागू लागते.

त्यांना पुन्हा जंगलात जाता येत नाही…

अशा अनाथ झालेल्या पिल्लांना रेस्क्यू सेंटरमध्ये कायमचे ठेवले जाते, तिथेच त्यांची खाण्यापिण्याची सोय केली जाते. त्यांना पुन्हा कधी जंगलात प्रवेश मिळत नाही. ही कहाणी सामान्य नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे बिबट्यांबाबत अनेक समज- गैरसमज अजूनही नागरिकांमध्ये आहेत. अनाथ बिबट्यांना दररोज एक ते दोन किलो ताजे चिकन दिले जाते. पिंजर्‍यामध्ये त्यांना जास्त व्यायाम होत नाही. त्यामुळे आठवड्यातून किमान दोन दिवस त्यांना उपाशी ठेवले जाते. बिबटे रेस्क्यू सेंटरमधील केंद्रामध्ये खेळतात, बागडतात. परंतु, त्यांना जंगलाची हवा कधीच खाता येत नाही ही त्यांची शोकांतिका आहे.

आता पिंजरे कमी पडत आहेत..

या रेस्क्यू सेंटरमध्ये दुसरा प्रकार जखमी झालेल्या बिबट्यांचा आहे. बहुतांश वेळा दुचाकी, चारचाकी खाली येऊन बिबटे जखमी होतात. रात्रीच्या वेळी वाहनाच्या धडकेने अनेक बिबटे या भागात जखमी झालेले आहेत. अनेकवेळा बिबट्यांच्या डोक्याला मार लागतो मणका फ्रॅक्चर होतो तसेच मल्टिपल फ्रॅक्चरही होते, अशा बिबट्यांनादेखील जंगलात सोडणे धोकादायक असते. त्यामुळे हे बिबटेदेखील या ठिकाणी आयुष्यभर राहतात. असे एकूण 40 बिबटे येथे आहेत. यात अनाथ बिबटे 15 ते 17 जखमी, बिबटे 20, तर नरभक्षक बिबटे तेवढ्याच संख्येने आहेत असे एकूण 40 बिबट्या केंद्रामध्ये आहेत. या ठिकाणी आता पिंजर्‍यांची संख्या कमी पडत आहे. कारण बिबटे झाले उदंड आणि पिंजरे झाले कमी अशीच अवस्था आहे.

हेही वाचा

कोल्हापूर : डॉक्टर दाम्पत्याचा बंगला फोडला; 25 तोळे सोने चोरले

Nashik News | शिवमहापुराण कथेत जीवनाचे सार्थक : पंडित मिश्रा

Maratha Reservation : कुणबी नोंदी संकेतस्थळावर अपलोड

Back to top button