

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे आता एसटी चालकांनाही महागात पडणार आहे. बसगाडी चालविताना चालक आढळल्यास राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, अशी कृती करणार्या चालकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली. एस.टी.च्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणार्या चालकांनी गेली 75 वर्षे प्रवाशांची विश्वासार्हता जपण्याचे काम केले आहे.
त्यामुळेच एस.टी. चा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो; परंतु गेल्या काही दिवसांमध्ये बस चालवितांना चालक भ्रमणध्वनीवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, भ्रमणध्वनीवरील व्हिडीओ पाहणे अशा धोकादायक कृती करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परिणामी गाडीमधून प्रवास करणार्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावत आहे.
यामुळे प्रवासी तसेच चालकाच्याही जीवितास धोका होऊ शकतो. याबाबत समाज माध्यमातून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एस.टी. महामंडळाकडे आल्या होत्या. त्यामुळे यापुढे अशा घटना निदर्शनास आल्यास संबंधित चालकावर निलंबनापर्यंतची कारवाई करण्याचे निर्देश एस.टी. च्या प्रशासनाने दिले आहेत.
हेही वाचा