Pune : ’सोमेश्वर’चे दीड लाख टन गाळप पूर्ण | पुढारी

Pune : ’सोमेश्वर’चे दीड लाख टन गाळप पूर्ण

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा :  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने नुकताच दीड लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला. कारखान्याने 20 दिवसांत 1 लाख 48 हजार टन उसाचे गाळप करीत 1 लाख 51 हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले.. साखर उतार्‍यात ‘सोमेश्वर’ने बाजी मारली असून, 10.16 साखर उतारा राखत जिल्ह्यात अग्रस्थान पटकावले आहे. माळेगाव साखर कारखान्याने 17 दिवसांत 1 लाख 35 हजार टन उसाचे गाळप करत 1 लाख 7 हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले. माळेगाव कारखान्याचा साखर उतारा 8.80 आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने येणार्‍या हंगामात सभासदांच्या उसासह गेटकेनवर भर दिला आहे. दररोज साडेआठ ते नऊ हजारांच्या सरासरीने कारखाना गाळप करीत आहे. कारखाना उसाचे गाळप करीत असताना कमीत कमी नुकसान, दर्जेदार साखर निर्मिती, इतर उपपदार्थ व साखरेचा उतारा चांगला राखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 43 हजार 501 एकर उसाची नोंद झाली होती. त्यामध्ये दुष्काळ आणि चार्‍यासाठी तुटलेल्या उसाची घट पकडून सध्या कारखान्याकडे 37 हजार 200 एकरांतील सरासरी एकरी 34च्या सरासरीने 12 लाख टन ऊस गाळपास उपलब्ध आहे. तर दीड ते दोन लाख टन गेटकेन ऊस आणण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. कारखाना चालू हंगामात 14 लाख टन उसाचे गाळप करणार आहे.

गत हंगामातील उसाला 3 हजार 350 रुपये दर देत ऑक्टोबर व नोव्हेंबरपासून ऊसलागवड व खोडव्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये ऊसलागवड करणार्‍या सभासदाला टनाला 75 रुपये अनुदान, तर डिसेंबरनंतर ऊसलागवड व खोडवा राखणार्‍या सभासदांसाठी टनाला 100 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारीत 75 रुपये, फेब—ुवारीत 100 रुपये, तर मार्चपासून ऊस तुटून जाईपर्यंत टनाला 150 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. दुष्काळी पार्श्वभूमी पाहता जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी गेटकेन ऊस आणण्यावर भर दिला आहे.

Back to top button