Pune News : पीपीई कीट घालून कर्मचार्‍यांचे आंदोलन | पुढारी

Pune News : पीपीई कीट घालून कर्मचार्‍यांचे आंदोलन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी सोमवारी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. काहींनी पीपीई कीट घालून मोर्चामध्ये सहभाग नोंदवला तर, राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

राष्ट्रीय आरोग्य अभियान हे 2005 पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आले व आरोग्यसेवा देण्याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा वाटा महाराष्ट्रात खूप मोठा आहे; परंतु सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांची शासनाकडून निराशाच झाली आहे. विविध मागण्यांसाठी बर्‍याच वेळा मोठ्या प्रमाणात आंदोलने केली; परंतु सरकारने आजपर्यंत फक्त आश्वासनेच दिली, असे संघटनेने म्हटले आहे. शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्या मागण्यांचा विचार केला नाही. त्याचा निषेध करत शासनाला जाग यावी, म्हणून कृती समितीने सोमवारी मोर्चा काढला.

काय आहेत मागण्या ?

आरोग्य विभागात नियमित पदावर जे कर्मचारी सेवा देत आहेत, त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचारीही सेवा देत आहे. पण सारखीच सेवा दिल्यावर वेतनातील तफावत तत्काळ दूर करण्यात यावी. ओडिशा, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब अशा राज्यांत एनएचएम कर्मचार्‍यांना नियमित कर्मचार्‍यांप्रमाणे ग्रेड-पे लागू करा. 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचारी अधिकारी आरोग्य विभागात आपत्कालीन सेवा देत आहे.

सुरुवातीला सहा ते आठ हजार या तुटपुंज्या मानधनावर काम सुरू करून सद्य:स्थितीत त्यांना 17 हजार ते 18 हजार एवढ्या तुटपुंज्या पगारावर कामे करीत आहेत. गेली अठरा वर्षे झाली राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचारी आरोग्य विभागात अविरत सेवा देत आहे. या सर्व कर्मचार्‍यांचा 100 टक्के शासनसेवेत समावेश केले पाहिजे. या प्रमुख मागण्या असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

Nashik News : राज्यपाल रमेश बैस आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर

77 हजार रुपयांचा टॉवेल स्कर्ट

Pune News : दिवाळीमध्ये पीएमपी सुसाट

Back to top button