

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बाजारात मटार, हिरवी मिरची आणि शेवग्याची मोठी आवक झाली आहे. त्यामुळे या भाज्यांच्या दरात घट झाली आहे; तसेच कोथिंबिरीची देखील आवक वाढली असून, पालेभाज्यांचे दर देखील घटले आहेत. दिवाळी सुट्टीमुळे गावी गेल्याने आठवडाभर ग्राहकांची वर्दळ काही कमी आहे; मात्र त्यातच रविवारी क्रिकेटचा अंतिम सामन्यामुळे बाजारात तुरळक प्रमाणात ग्राहक दिसून आले. शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सामान्यांच्या आवाक्या बाहेर गेलेला मटार किरकोळ बाजारात प्रतिकिलो दोनशे रूपयांहून अधिक दराने विक्री होत होता. मात्र आता इंदोर येथील मटारची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने मटारचे दर घटले असून, प्रतिकिलो 100 रूपये दराने विक्री झाल्याने सामान्यांच्या आवाक्यात आला आहे.
कर्नाटकातील हिरवी मिरची बाजारात दाखल झाल्याने 80 ते 100 रूपये प्रतिकिलो विक्री होणारी हिरवी मिरची आता 50 रूपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. यासंह शेवग्याची देखील आवक वाढली असून दरात मोठी घट झाली आहे. कोथिंबीरीसह पालेभाज्यांची आवक वाढल्याने यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात होते.
मोशी उपबाजारातील घाऊक दर : (प्रतिकिलो)
कांदा 27 ते 30, बटाटा 11 ते 15, टोमॅटो 25 ते 30, आले 70 ते 80 , लसूण 80, मटार 50, शेवगा 55 ते 60, काकडी 20 ते 25 व गवार 50 रूपये प्रतिकिलो दराने विक्री झाली.
मोशी उपबाजारातील आवक : (क्विंटल)
कांदा 474, बटाटा 813, आले 25, लसूण 10, गाजर 75, गवार 7, शेवगा 16, हिरवी मिरची 94, टोमॅटो 298, काकडी 69 क्विंटल एवढी आवक झाली आहे.
मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 48600 पेंड्या, फळे 213 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 3085 क्विंटल एवढी आवक झाली.