

हिंजवडी: पुढारी वृत्तसेवा : दिवाळी नंतर मोठ्या कालावधीनंतर प्रशासकीय कामकाज सुरू होत आहे. अनेक अधिकारी, लोकांकयुक्त पदाधिकारी आता कामावर रुजू होत आहे. त्यामुळे पेंडिंग कामाची लगबग सध्या विविध शासकीय कार्यालयात आहे. परंतु हिंजवडी ग्रामपंचायत चा अजब कारभार सध्या पहावयास मिळत आहे. येथील सरपंच गणेश जांभुळकर आणि ग्रामसेवक यांच्या सोमा खैरे यांच्या दालनास टाळे होते. दरम्यात कामानिमित्त काही व्यावसायिक, कर भरण्यासाठी आलेले नागरिक आणि ग्रामपंचायत संबंधी कामे घेऊन आलेल्या नागरिकांची गैरसोय होत होती.
येथील ग्रामसेवक खैरे मागील काही दिवसांपासून रजेवर होते. दरम्यानच्या काळात त्यांचे केबिन बदलून सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या केबिनच्या अदला-बदली करण्यात आली होती. आज कामावर हजेरी लावली. मात्र आपले दालन बाहेरून 'लॉक' असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी ग्रामपंचायतच्या 'कॉन्फरन्स हॉल' मध्ये जात कामास सुरुवात केली. परंतु सरपंच येथे उपलब्ध न्हवते. येथील कर्मचाऱ्यांनी देखील सरपंच येणार असल्याची माहिती दिली मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत परिस्थिती 'जैसे थे' होती. दरम्यान सरपंच उपलब्ध नाहीत आणि ग्रामसेवक जागेवर नाहीत अशा परिस्थितीत कर्मचारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. कर्मचाऱ्यांची फोनाफोनी सुरू होती, नक्की काय प्रकार आहे याची उत्सुकता होती.