

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण बाबत सरकारची कार्यपद्धती पाहून निराश होत आत्महत्या करणाऱ्या खेड तालुक्यातील चिंबळी गाव येथील सिद्धेश सत्यवान बर्गे (वय २१ वर्ष) या तरुणाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचे मनोज जरांगे पाटील यांनी सांत्वन केले.रविवारी (दि.१९) रोजी कोकणातून सभा उरकून रात्री उशिरा जरांगे पाटील पुण्यातील कार्यक्रमासाठी दाखल झाले यावेळी आळंदी दौऱ्यावर असताना त्यांनी चिंबळी येथे जाऊन बर्गे कुटुंबाची भेट घेतली.सिद्धेशचे चुलते चिंबळी सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बर्गे,वडील सत्यवान बर्गे,आजी,आई,बहीण,भाऊ व नातेवाईकांशी त्यांनी यावेळी संवाद साधला.
तुमच्या कुटूंबाच्या दुःखात संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज सहभागी आहे,सिद्धेशच बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मी इंचभर देखील मागे हटणार नाही काळजी करू नका, बर्गे कुटूंबाला शासकीय मदत मिळण्यासाठी नक्कीच मदत करेल असे यावेळी त्यांनी कुटूंबाशी बोलताना सांगितले अवघ्या एकवीसाव्या वर्षी सिद्धेशने जीवन संपवले याबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली मराठा तरुणांनी लढ्यात साथ द्यावी आत्महत्या करू नये अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे,बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे,माजी सरपंच अर्जुन अवघडे,माजी उपसरपंच विश्वास बर्गे,माजी अध्यक्ष अर्जुन जाधव,माजी उपसरपंच हेमंत जैद,सोसायटीचे माजी अध्यक्ष माऊली कड,माजी उपसरपंच शिवाजी कड,राष्ट्रवादी ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्ष संभाजी अवघडे,उद्योजक अमोल बहिरट,सुमित जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.