Crime news : कामावरून काढल्याच्या कारणातून वादातून केला गोळीबार | पुढारी

Crime news : कामावरून काढल्याच्या कारणातून वादातून केला गोळीबार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कामावरुन काढून टाकले, या गैरसमजातून झालेला वाद मिटविल्यानंतर दोघांनी तरुणावर गोळीबार केल्याची घटना बाणेर रस्त्यावरील महाबळेश्वर हॉटेलजवळ घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकाश बाणेकर (वय २८, रा. लवळे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत निलेश दत्तात्रय पिंपळकर (वय ३८, रा. गुजरात कॉलनी,कोथरुड) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अदित्य दिपक रणावरे व सागर लक्ष्मण बनसोडे यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी कट्टा व जिवंत राऊंड जप्त केला आहे. हा प्रकार बाणेर रोडवरील महाबळेश्वर हॉटेलजवळ रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश पिंपळकर आणि रोहित ननावरे हे दोघे बाणेर येथील एका मोटार कंपनीत कामाला आहेत. कंपनीने रोहित याला कामावरुन काढून टाकले़ फिर्यादी याच्यामुळेच आपल्याला कामावरुन काढून टाकले, या गैरसमजुतीतून त्याने फिर्यादी यांना महाबळेश्वर हॉटेलजवळ बोलावून घेतले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रोहित ननावरे याच्या मित्रांनी रोहितला घरी नेऊन सोडले. फिर्यादी व आकाश बाणेकर हे तेथे बोलत थांबले असताना रोहितला सोडून आदित्य रणावरे, सागर बनसोडे तेथे आले़ त्यांच्याशी पुन्हा वाद झाला. तेव्हा आदित्य याने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यातील गोळी आकाश बाणेकर याच्या उजव्या पायांच्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा :

Back to top button