धोकादायक असला तरीही बिबट्याला पकडताना आहेत अनेक बंधने…

धोकादायक असला तरीही बिबट्याला पकडताना आहेत अनेक बंधने…
Published on
Updated on

पुणे : गावकरी म्हणतात, बिबट्या आम्हाला दिवसातून आठ ते दहा वेळा दिसतो, त्यामुळे त्याची प्रचंड दहशत गावात आहे. वन विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली असता ते म्हणाले की, जसा माणसांना जगण्याचा अधिकार आहे, तसा बिबट्यालाही आहे. वन्यजीव कायद्याने तो शेड्यूल 'अ'मध्ये येतो, त्यामुळे त्याला मारता येत नाही. जखमी झाला किंवा त्याने माणसावर हल्ला केला, तरच त्याला रेस्क्यू सेंटरमध्ये दाखल करता येते. वन विभागाच्या अधिकार्‍यांच्या मते बिबट्या अत्यंत भित्रा प्राणी आहे. त्यामुळे आपली शिकार सतत इतर प्राण्यांपासून लपवण्याचा प्रयत्न करतो, आपली शिकार कोणी चोरून नेऊ नये म्हणून त्याने एक तंत्र अवगत केलेले आहे, ते म्हणजे आपल्या वजनाच्या तिप्पट वजनासह तो झाडावर उचलून नेण्याचे.

ही किमया केवळ बिबट्याच करू शकतो. वाघ आणि सिंहांना हे जमलेले नाही. बिबट्याने मात्र अधिवास बदलासह अनेक बदल स्वतःमध्ये केले आहेत, त्यात हा एक मोठा बदल बिबट्याने केला आहे. नराचे वजन हे 70 ते 80किलो तर मादीचे वजन 50 ते 60 किलो असते.

हल्ला करण्याआधी त्याने सावजाला दहा वेळा पाहिलेले असते
वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, बिबट्या अतिशय चलाख प्राणी आहे. माणूस बिबट्याला एकदा पाहतो तेव्हा त्याने माणसाला त्या आधी किमान दहा वेळा पाहिलेले असते. त्याचा वेग, डोळ्यांची हालचाल आणि सावज टिपण्याचा ती कला ही इतर प्राण्यांच्या तुलनेत अतिशय वेगवान आहे. कोणत्या बाजूने हल्ला करायचा याचे नियोजन त्याने खूप आधी आखलेले असते. माणसाला तो चुकून एखाद्या वेळी दिसतो तेव्हा माणसाला वाटते आपणच त्याला प्रथम पाहिले. मात्र त्या व्यक्तीला बिबट्याने त्या आधी आठ ते दहा वेळा पाहिलेले असते.

दररोज शोधतो छोटे भक्ष्य…
बिबट्या शक्यतो आपल्या वजनाला पेलवेल इतकीच शिकार करतो. वाघासारखी मोठी शिकार करीत नाही. प्रामुख्याने शेळीची छोटी पिल्ले त्याचे खूप आवडते खाद्य आहे. बहुतांश वेळा शिकार न मिळाल्यास तो दिसेल ती शिकार खाऊन जगतो. यात कोंबड्यापासून ते अगदी किड्यांपर्यंत मिळेल ते खाऊन तो जिवंत राहतो.

आमचे हात बांधलेले…
कलम 1972 प्रमाणे बिबट्या हा परिशिष्ट अ (शेडूल ए) मध्ये येतो. त्यामुळे हा अतिशय संरक्षित प्रकारचा प्राणी आहे, त्यामुळे आम्हाला सतत सतर्क राहावे लागते. बिबट्या गावात आला अन त्याने हल्ला चढवला तर आम्ही तत्काळ त्या ठिकाणी धावून जातो. माणसांसह बिबट्याला अपघातात काही जखम झाली तरी त्याला तत्काळ उचलून रेस्क्यू सेंटरमध्ये नेतो. दोघांवरही उपचार करतो.

जखमी बिबट्यालाच रेस्क्यू सेंटरमध्ये भरती करता येते…
वन विभागाचे अधिकारी म्हणाले, बिबट्या शक्यतो हाती लागतच नाही. तो अपघातात जखमी झाला तरच सापडतो. गंभीर जखमी असेल तर या केंद्रात त्याला कायमचे ठेवावे लागते. बिबट्याला माणूस आणि जनावर यातला फरक कळत नाही. माणूस वाकला असेल तर तो त्याला चार पायांचा समजून त्याच्यावर हल्ला चढवतो. लहान मूल असेल तरी त्याला ते लहान आहे ही भावना कळत नाही. त्याला ते जनावराचे छोटे पिल्लूच वाटते प्रामुख्याने बिबट्यांचे खाद्य हे शेळ्या, मेंढ्या, कुत्री आणि वासरे असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news