Maratha Reservation : मराठ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचाय : मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation : मराठ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचाय : मनोज जरांगे पाटील
Published on
Updated on

भोर : पुढारी वृत्तसेवा :  आरक्षणासाठी कुठल्याही राजकीय नेत्याशी संबंध न ठेवता आपली लढाई छत्रपतींच्या गनिमा काव्याप्रमाणे असेल. सर्वांनी एकजुटीने लढा हातात घेतला आहे. विजयाचा दिवस जवळ आला आहे. येत्या 24 डिसेंबरला मराठ्याच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पहायचा आहे, असे प्रतिपादन मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले.

भोर येथील शेटे मैदानावर झालेल्या सभेत जरांगे बोलत होते. जरांगे यांचे भोर तालुक्यातील शिरगाव, हिरडोशी, निगुडघर, आपटी, आंबेघर गावातील ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. भोर शहरात सकल मराठा बांधवांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवतीर्थाजवळ त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. सभास्थळी भोर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने अध्यक्ष संजय भेलके यांच्या हस्ते जरांगे यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी जरांगे म्हणाले की, मागील 70 वर्षे आपल्या मराठ्यांच्या लेकरला कुजविण्याचे काम सरकारने केले आहे. काही राजकीय नेते जाती -जातीमध्ये दंगल घडून आणण्याचा प्रयत्न करत कायदा पायदळी तुडवण्याचे काम करत आहेत. राजकीय फायद्यासाठी दोन जातीमध्ये दंगल करून खुर्ची बचावाचे षडयंत्र सुरू आहे. छगन भुजबळांबरोबर आतापर्यंत राजकीय विरोध होता. परंतु, यापुढे वैयक्तिक विरोध राहणार आहे.

मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरपर्यंतची मुदत आपण सरकारला दिली आहे, तोपर्यंत सरकार सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देईल. जर हे शक्य झाले नाही तर राज्यात त्सुनामी येईल, असा इशारा त्यांनी दिला. आतापर्यंत राज्यामध्ये 29 लाख मराठा समाजाचे कुणबीचे प्रमाणपत्र सापडले आहे. भोर तालुक्यात 7069 कुणबी जातीचे प्रमाणपत्र सापडले आहे. अनेक गावांमधील रेकॉर्ड जळीत असून या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील मराठा समाजबांधवांसाठी सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी विनंती केली जाईल. एक डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन जरांगे यांनी केले.

या सभेला भोर, वाई, खंडाळा, शिरवळ, हवेली, पुणे येथील सुमारे आठ हजार मराठा बांधव उपस्थित होते. मुस्लिम बांधवांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. मराठा समाजबांधवांना सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीचे निवेदन मनोज जरांगे पाटील यांनी नायब तहसीलदार अजिनाथ गाजरे यांना दिले. सूत्रसंचालन संजय देवकर यांनी केले.

इंचभरही मागे हटणार नाही

मावळ खोऱ्यातील खासदार, आमदार यांनी मराठा समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे. जर उभे राहिले नाही तर आम्ही तुमच्या विरोधात लढा देण्यासाठी सज्ज झालेलो असू. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय इंचभरही मागे हटणार नाही, याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news