पुणे : पीएच.डी. मार्गदर्शकांसाठी सुधारित नियमावली | पुढारी

पुणे : पीएच.डी. मार्गदर्शकांसाठी सुधारित नियमावली

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  विद्यापीठ अनुदान आयोगाने संशोधक मार्गदर्शकांसाठी नुकतीच सुधारित नियमावली तयार केली आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देखील पीएच.डी. मार्गदर्शकांसाठी सुधारित नियमावली जाहीर केली असून, महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीला विषय असेल, तरच संबंधित प्राध्यापकांना मार्गदर्शक होता येणार आहे. त्याचबरोबर आणखी काही नियम तयार करण्यात आले असून, संबंधित नियम महाविद्यालये, तसेच प्राध्यापकांना अनिवार्य असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाच्या नियमावलीनुसार, संशोधन मार्गदर्शक मान्यतेसंदर्भातील तरतुदीनुसार अर्जदार अध्यापक नियमित स्वरूपात ज्या महाविद्यालयात कार्यरत आहे, त्या महाविद्यालयात संबंधित विषय हा पदव्युत्तर पदवीस्तरावर शिकविला जात असेल, तरच संबंधित विषयात संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात यावी.

विद्यापीठ अनुदान आयोगाची 7 नोव्हेंबर, 2022 ची अधिसूचना निर्गमित होण्यापूर्वी ज्या अध्यापकांना, त्यांच्या महाविद्यालयात संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकविला जात नाही, तरीही संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिलेली आहे ती, त्यांना नवीन विद्यार्थी न घेण्याच्या अटीवर सुरू ठेवण्यात यावी. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 7 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या अधिसूचनेनंतर ज्या अध्यापकांना, ते कार्यरत असलेल्या महाविद्यालयांत संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकविला जात नाही, तरीही संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिलेली आहे. अशा अध्यापकांनी ते कार्यरत असलेल्या महाविद्यालयात संबंधित विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास विद्यापीठाने संलग्नीकरण दिल्याचा पुरावा सादर केल्यानंतरच त्यांना पीएच.डी.चे विद्यार्थी घेण्यास मान्यता देण्यात यावी.

संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिलेल्या अध्यापकांची संस्थेंतर्गत इतर महाविद्यालयांत बदली किंवा इतर महाविद्यालयांत नव्याने नियुक्ती झाल्यास व अशा महाविद्यालयात संबंधित विषय पदव्युत्तर पदवी स्तरावर शिकविला जात नसल्यास अशा अध्यापकांनी ते कार्यरत असलेल्या महाविद्यालयात संबंधित विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास विद्यापीठाने संलग्नीकरण दिल्याचा पुरावा सादर केल्यानंतरच त्यांना पीएच.डी.चे विद्यार्थी घेण्यास मान्यता देण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

Back to top button