या दिवाळीत पुणेकरांकडून 11 कोटींचा घरगुती फराळ फस्त | पुढारी

या दिवाळीत पुणेकरांकडून 11 कोटींचा घरगुती फराळ फस्त

सुवर्णा चव्हाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात दिवाळीमध्ये तब्बल अकरा कोटींचा घरगुती फराळ यंदा विकला गेल्याचे ऐकून आश्चर्य वाटेल…पण, हे खरंय…यावर्षीच्या दिवाळीत घरगुती व्यवसाय करणार्‍या महिलांनी बनविलेल्या तयार फराळाला प्रचंड मागणी होती आणि सुमारे 25 टन फराळाची विक्री झाली. शंकरपाळे, चिवडा, चकली, अनारसे आणि लाडू अशा स्वादिष्ट फराळाची सर्वाधिक मागणी होती आणि जवळपास 8 हजार महिला व्यावसायिकांनी दिवाळीत फराळ विक्रीचा व्यवसाय केला. महिला व्यावसायिकांची दिवाळी गोड ठरली.
फराळ तयार करणार्‍या महिला व्यावसायिकांच्या व्यवसायाला मोठा प्रतिसाद मिळाला. दसर्‍यानंतर महिलांनी फराळ तयार करायला सुरुवात केली आणि दिवाळीतही महिला व्यावसायिकांना ऑर्डर येत होत्या. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीजेला फराळाची सर्वाधिक विक्री झाली. महिला व्यावसायिकांना घरगुती स्तरावर फराळासाठी ऑर्डर आल्याच. पण, विविध कंपन्यांकडूनही ऑर्डर मिळाल्या. दिवाळीच्या सीझनमध्ये एका महिला व्यावसायिकाने 70 ते 80 ऑर्डर पूर्ण केल्या. तसेच दिवाळीत दीड लाख लोकांना रोजगार मिळाला. कुरिअर कंपन्यांनीही देश-परदेशात मोठ्या प्रमाणात फराळ पाठविले.

महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले, यावर्षी महिला व्यावसायिकांनी तयार केलेल्या घरगुती फराळाला सर्वाधिक मागणी होती. नोकरदार आणि व्यावसायिक महिलांनी मोठ्या प्रमाणात तयार फराळाची खरेदी केली. फराळाला यंदा घरगुतीस्तरावरूनच नव्हे, तर विविध कंपन्यांकडून मागणी होती. विशेष म्हणजे परदेशातूनही फराळाला मोठी मागणी होती. बेसन लाडू, रवा लाडू, साजूक तुपातील लाडू यासह चिवडा, अनारसे, चकली, शंकरपाळे या फराळाला जास्त मागणी होती. घरी फराळ तयार करण्यापेक्षा अनेकांनी तयार फराळाच्या खरेदीवर भर दिला.

साजूक तुपातील लाडू साधारणपणे 550 रुपये, तर बेसन लाडू 400 रुपये प्रतीकिलो विकले गेले. तर हातवळणीच्या चकलीला यंदा जास्त मागणी होती. 600 रुपये एक किलो असा चकलीचा दर होता. वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा साधारणपणे 400 ते 500 रुपये किलोला मिळत होता. पातळ पोह्यांचा चिवडा आणि भाजक्या पोह्यांच्या चिवड्याला मोठी मागणी होती. तर बेक केलेले शंकरपाळे जास्त विकले गेले. मागील वर्षी पुणे जिल्ह्यात 8 कोटींचा फराळ विकला गेला होता. सुमारे 17 टन फराळाची विक्री झाली होती, तर यंदा 11 कोटी रुपयांच्या फराळाची विक्री झाली आहे, तर सुमारे 25 टन फराळ विकला गेला आहे. यावर्षी दुपट्टीने तयार घरगुती फराळाची विक्री झाली असून, यंदा घरगुती फराळाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे किशोर सरपोतदार यांनी सांगितले.

तयार फराळाच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. घरगुतीस्तरावरूनच नव्हे, तर सोसायट्या आणि कंपन्यांकडूनही फराळासाठीच्या ऑर्डर मिळाल्या. 60 ते 65 फराळाच्या ऑर्डर दिवाळीत पूर्ण केल्या. यासाठी फराळ तयार करण्यासाठी कर्मचार्‍यांनी खूप सहकार्य केले. आम्ही तयार केलेल्या 75 ते 80 किलो चकली, शंकरपाळे 40 ते 45 किलो, रवा आणि बेसन लाडू 40 ते 45 किलो आणि चिवडा 30 ते 35 किलो विकले गेले. यंदा व्यवसायाला उभारी मिळाली.
                                                           – सुजाता कोतवाल, महिला व्यावसायिक

Back to top button