Pune news : डेंग्यूमुळे अजित पवारांची दांडी तर रोहित पवार बीडला  | पुढारी

Pune news : डेंग्यूमुळे अजित पवारांची दांडी तर रोहित पवार बीडला 

बारामती : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झालेला आहे.  गेली २०-२५ दिवस ते कोणत्याच सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे ते दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत, तर आमदार रोहित पवार हे संघर्ष यात्रेच्या निमित्ताने बीडला असल्याने ते ही उपस्थित नसल्याचे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
दिवाळी पाडव्याला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार पाडव्याला उपस्थित नसल्याच्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केले. परंतु रणजित पवार व अन्य कुटुंबिय उपस्थित असल्याचे त्या म्हणाल्या. जी गोष्ट आहे त्याचा आनंद आपण व्यक्त करत वास्तवतेत जगले पाहिजे. अर्धा ग्लास रिकामा आहे की अर्धा ग्लास भरलेला आहे, यावर आपली मानसिकता ठरते. पांडूरंगाने मला आयुष्यात खूप गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामुळे पांडूरंगाची मी आयुष्यभर ऋणी आहेत.
माझ्यासाठी माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ति महत्त्वाची आहे. दादा नाहीत पण आज रोहितही व्यासपीठावर नाही हे लक्षात घेतले पाहिजे असे त्या म्हणाल्या . रोहित पवार हे संघर्ष यात्रेच्या निमित्ताने बीडला गेले आहेत. महाराष्ट्रासमोर महागाई, बेरोजगारी याचे आव्हान आहे. त्या विरोधात ते संघर्ष करत असून मला त्याचा अभिमान आहे. सगळ्यांचा घराघरात सण साजरा असला तरी महाराष्ट्राच्या नवीन पिढीसाठी तो संघर्ष करतो आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे त्या म्हणाल्या.
राज्यातील मायबाप जनतेला शुभेच्छा देते. हे वर्ष सगळ्यांना सुख-समृद्धीचे आनंदाचे जाओ. महाराष्ट्रात आज महागाई, बेरोजगारी, दुष्काळाचे सावट आहे ते दूर होअो ही पांडूरंग चरणी प्रार्थना करते या शब्दात सुळे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
हेही वाचा

Back to top button