पुणे : जुन्नर तालुक्यात भाताचे उत्पादन घटणार | पुढारी

पुणे : जुन्नर तालुक्यात भाताचे उत्पादन घटणार

 नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भात पिकाच्या उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कापलेला भात भिजल्याने अडचणीत अधिक वाढ झाली आहे. जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये भात हे मुख्य पीक आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे भात पिकाचे उत्पन्न 50 टक्के घटले असे या भागातील शेतकरी सांगत आहेत. भात लागवडीसाठी होणारा खर्च आणि भात कापणीसाठी लागणारे मजूर व भाताचे निघणारे उत्पन्न याचा आर्थिक ताळमेळ बसत नाही. त्यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे भात पिकाचे अधिक नुकसान झाले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी या भागातील भात पिकाची पाहणी करून पंचनामे करून शासनाकडून या शेतकर्‍यांना आर्थिक सहकार्य मिळावे, अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या :

पठारावरील आंबे, सुकाळवेढे, हातवीज, हिवरे तर्फे मिन्हेर या परिसरात वादळी वार्‍यासह जोराचा पाऊस झाला. भात खाचरे पाण्याने भरली. शेतकर्‍यांनी काढणीस आलेले भात पीक कापून खाचरात वाळण्यासाठी ठेवले होते, ते पाण्यात भिजले. ऐन दिवाळीत आदिवासी शेतकर्‍यांवर संकट कोसळल्याने शासनाने नुकसानभरपाई देऊन सहकार्य करण्याची गरज आहे. आदिवासी भागातील भात हे मुख्य पीक आहे. यावर्षी अवकाळी पावसाने चावंड, खडकुंबे, पूर, घाटघर, अंजनावळे, देवळे, निमगिरी, खैरे, खटकाळे, हिवरे तर्फे मिन्हेर, सुकाळवेढे, हातवीज, आंबे आदी आदी भागातील भात उत्पादकांचे नुकसान झाले आहे. उच्छिल, भिवाडे, सोनावळे, आंबोली या परिसरामध्ये भाताचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्थानिक शेतकर्‍यांनी सांगितले. सुरुवातीच्या कमी पावसामुळे भाताचे उत्पादन घटल्यामुळे वर्षभरामध्ये आदिवासी भागातील जनतेला याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

Back to top button