पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने अपेक्षित प्रमाणात हजेरी न लावल्यामुळे मुख्य पिकांचे 75 टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र नापेर राहिले. त्यामुळे बारामती तालुक्यातील बाजरी पीक व शिरूर तालुक्यातील मुगाची लागवड करणा-या शेतकर्यांना मिळून सुमारे चार कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.
पावसाअभावी एखाद्या जिल्ह्यात पिकाचे क्षेत्र पंचाहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त नापेर राहिल्यास जिल्हाधिकारी अधिसूचना काढून त्या महसूल मंडळातील संबंधित पिकांकरिता विमा योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकर्यांना विमा संरक्षित रकमेच्या 25 टक्के नुकसानभरपाईचे आदेश देतात आणि विमा पॉलिसी संपुष्टात येत असते.
त्यानुसार पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात बाजरीच्या 5 हजार 284 शेतकर्यांना 1 कोटी 85 लाख रुपये नुकसानभरपाईची रक्कम मंजूर झाली आहे. तर शिरूर तालुक्यातील 7 हजार 916 शेतकर्यांना 2 कोटी 19 लाख रुपये मंजूर झाले आहेत. अशा पद्धतीने पुणे जिल्ह्यातील एकूण 13 हजार 200 शेतकरी नुकसानभरपाईस पात्र ठरले आहेत.
त्यांना नुकसानभरपाईपोटी 4 कोटी 4 लाख रुपये मंजूर झाले असून, ही रक्कम एचडीएफसी अर्गो कंपनीमार्फत देण्याची कार्यवाही सुरू झाल्याची माहिती कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. दरम्यान, अशाच पद्धतीची नुकसानभरपाई सांगली जिल्ह्यातही मंजूर झाली आहे. तेथील 10 हजार 707 शेतकर्यांना 5 कोटी 57 लाख रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम देण्याची कार्यवाही भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत देण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा