Pune News : अवकाळी पावसामुळे भात पिके उद्ध्वस्त ! | पुढारी

Pune News : अवकाळी पावसामुळे भात पिके उद्ध्वस्त !

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात भात पिकांचे आगर म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंहगड परिसरासह हवेली तालुक्याच्या पश्चिम भागातील उभी भात पिके शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली. हातातोंडाशी आलेला घास ऐन दिवाळीत निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील दहा हजार हेक्टर क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांची भात पिके वाया गेली आहेत.
राज्य सरकारने सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. सिंहगड, राजगड, तोरणा, पानशेत, मोसे, मुठा खोर्‍यातील कष्टकरी मावळी शेतकर्‍यांचे पिवळं सोनं पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे. ऐन सणासुदीत आसमानी संकट कोसळल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने यंदा पन्नास-साठ टक्के उत्पन्न मिळण्याची शक्यता होती. मात्र, अवकाळी पावसामुळे ही पिकेही जमीनदोस्त झाल्याने शेतकर्‍यांची दिवाळी कडू झाली आहे.
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास परिसरात जोरदार वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. सिंहगड किल्ल्याच्या  चोहोबाजूंना धोधो पाऊस कोसळू लागला. त्यानंतर पाऊस सर्वदूर झाला. दिवाळीच्या आधी शेतकर्‍यांनी भात पिकांच्या कापणीला सुरुवात केली होती. मात्र, अवकाळी पावसामुळे कापणी केलेले भात पिके खाचरात साचलेल्या पाण्यात तरंगत असल्याचे चित्र दिसून आले.
तसेच उभी पिकेही जमीनदोस्त झाली आहेत. खानापूर, डोणजेपासून पुणे-पानशेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला पानशेतपर्यंत सर्वत्र पावसाने अक्षरश: थैमान घातले. मांगदरी, आंबवणे भागांसह वेल्हे तालुक्यात रात्री उशिरापर्यंत धोधो पाऊस  कोसळत होता. हवेली तालुक्याच्या पश्चिमपट्ट्यात सिंहगड, खामगाव, मावळ, आंबी, सोनापूर, वरदाडे, मालखेड -थोपटेवाडी कल्याण, आर्वी भागांतही पावसामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली. या पावसाने दहा हजार हेक्टरवरील भात पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
अवकाळी पावसामुळे भात खाचरांत पाणी साचल्याने उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. कापणी केलेले भातही भिजून वाया गेली आहेत.  त्यामुळे तांदळाचे उत्पादन निम्म्याहून अधिक घटणार आहे. सरकारने याची दखल घेऊन शेतकर्‍यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी.
– तानाजी मांगडे, 
उपाध्यक्ष, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस.
अवकाळी पावसामुळे पानशेत, राजगड भागांसह तालुक्यात भात पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच कृषी विभागाला दिल्या आहेत.
– दिनेश पारगे,
तहसीलदार, वेल्हे तालुका.

Back to top button