Diwali-2023 : पोटातील बाळासाठी फटाक्यांपासून दूर राहा! | पुढारी

Diwali-2023 : पोटातील बाळासाठी फटाक्यांपासून दूर राहा!

पुणे : दिवाळीनिमित्त सध्या सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या काळात गर्भवती महिलांनी फराळाचे सेवन करताना पथ्ये पाळावीत, फटाक्यांपासून दूर राहावे आणि स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
फराळाशिवाय दिवाळीचा सण साजरा होऊ शकत नाहीत. मात्र, गर्भवती महिलांनी गोड आणि तळलेले पदार्थ खाण्याबाबत पथ्य पाळायले हवे. गर्भावस्थेच्या काळात संप्रेरकांतील बदलांमुळे अ‍ॅसिडिटी, छातीत जळजळ, गर्भावस्थेतील मधुमेह, असा त्रास होऊ शकतो.

त्यामुळे आपण काय खात आहोत, याकडे विशेष लक्ष द्यावे. एकाच वेळी सर्व पदार्थ खाण्याऐवजी दररोज एक पदार्थ चवीपुरता खावा, असा सल्ला प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुचेता पार्टे यांनी दिला आहे. दिवाळीच्या सुटीचा गर्भवती मातांनी सुरक्षितरीत्या आनंद घ्यावा. फटाक्यांच्या आवाजापासून आणि धुरापासून दूर राहावे. कुटुंबातील सदस्यांसोबत एकत्रितरीत्या या सणाचा आनंद लुटावा. योग्य ती काळजी घेऊन सर्वांसोबत आनंदाने हा वेळ घालवा. यामुळे मिळणारी सकारात्मक ऊर्जा आई आणि बाळाला निरोगी राहण्यास मदत करेल, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

काळजी कशी घ्यावी?

  • फळांसारख्या पोषक पर्यायांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. सणासुदीच्या कालावधीत सुका मेवा आणि खजूर यांसारख्या पदार्थांचे सेवन करावे. मिठाई, नमकीन, सोडा आणि कार्बोनेटेड पेयांचे सेवन टाळणे योग्य राहील.
  • दिवाळीची सफाई, खरेदी करताना दगदग होणार नाही, शारीरिक श्रम जास्त होणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • योगा तसेच मेडिटेशनचा सराव करावा, नियमित विश्रांती घ्यावी.
  • हिवाळा असला तरी भरपूर पाणी प्यावे.
  • गर्भवती महिलांनी सणासुदीच्या काळातही डॉक्टरांकडे नियमित तपासणी आणि फॉलोअपसाठी जाणे आणि वेळच्या वेळी औषधांचे सेवन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा

Back to top button