Pimpri News : कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत पुरावे शोधणार | पुढारी

Pimpri News : कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत पुरावे शोधणार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातप्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक पुरावे शोधण्यासाठी महापालिका विविध विभागांतील नोंदी तपासणार आहे. महापालिकेशी संबंधित अभिलेखांमध्ये उपलब्ध असलेल्या पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून दस्तावेजांची पूर्तता करून घेण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.7) सांगितले.

त्यासंदर्भात आयुक्तांनी आदेश काढले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मराठा समाजातील संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी, तपासणीअंती कुणबी जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करून अहवाल शासनास सादर करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या वतीने सन 1948 ते 1967 या कालावधीतील जन्म-मृत्यू नोंदी, शैक्षणिक अभिलेख, भूमि अभिलेख, सेवानोंद पुस्तके तसेच महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या करआकारणी नोंद रजिस्टरमध्ये कुणबी जातीच्या पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी सहायक आयुक्त शिंदे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विविध विभागांतील कागदपत्रावरील नोंदी तपसाणीच्या कामकाजासाठी संबंधित विभागाचे प्रमुख जबाबदार असणार आहेत. या विभागप्रमुखांनी नोडल अधिकार्यांशी समन्वय साधून कामकाज पूर्ण करावे, असे आदेशात नमूद केले आहे. या कामकाजासाठी संबंधित विभागाचा कर्मचारी वर्गाची नियुक्ती करावी. पुराव्याच्या तपासणीअंती विभागस्तरावर स्वतंत्र रजिस्टर तयार करण्यात यावे. विवरण पत्रामध्ये माहितीच्या नोंदी व संकलन करून ते नोडल अधिकार्यांकडे सादर करावे. नोडल अधिकार्‍यांना आवश्यकता वाटल्यास अधिकची माहिती किंवा पुरावे जमा करण्याकामी संबंधित विभागांना किंवा विभागप्रमुखांना निर्देश देता येणार आहेत. विहीत वेळेत हे कामकाज पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिकेच्या वैद्यकीय विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, भूमि व जिंदगी, लेखा विभाग तसेच करआकारणी व करसंकलन विभागाच्या प्रमुखांनी सन 1948 ते 1967 या कालावधीमध्ये महापालिकेच्या उपलब्ध अभिलेखांची छाननी करून अभिलेखांमध्ये कुणबी जातीच्या नोंदी असल्याचे आढळून आल्यास अशा पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी केली जाणार आहे.

– शेखर सिंह, आयुक्त

हेही वाचा

 

Back to top button