Pune News : कर्मचारी महापालिकेत, पण वेतन ग्रामपंचायती एवढेच | पुढारी

Pune News : कर्मचारी महापालिकेत, पण वेतन ग्रामपंचायती एवढेच

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत समाविष्ट होऊन दोन वर्षे होऊनही 23 गावांमधील कर्मचार्‍यांना मात्र अद्यापही ग्रामपंचायतीप्रमाणेच वेतन घ्यावे लागत आहे. या कर्मचार्‍यांच्या वेतन निश्चितीचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने संबंधित ग्रामपंचायतीकडून जेवढे वेतन दिले जाते होते, तेवढेच वेतन सध्या महापालिकाही देत आहे. पुणे महापालिकेत जुलै 2021 ला हद्दीलगतच्या 23 गावांचा समावेश झाला.

या 23 गावांमधील जवळपास 400 पेक्षा अधिकारी, कर्मचारी या निर्णयामुळे महापालिकेत आले आहेत. मात्र, गावे पालिकेत येऊन आता दोन वर्षांचा कालावधी होत आला असला, तरी संबंधित कर्मचार्‍यांचे सेवा पुस्तक मिळणे, त्याचे नक्की पद काय होते तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे अद्यापही पालिकेला मिळालेली नाहीत.

त्यामुळे या कर्मचार्‍यांची वेतन निश्चिती झालेली नाही. त्यामुळे गेल्या जवळपास पावणेदोन वर्षापासून ग्रामपंचायतीत जेवढे वेतन मिळत होते, तेवढेच वेतन या कर्मचार्‍यांना पालिकेकडून दिले जात आहे. त्यामुळे आता या कर्मचार्‍यांना दिवाळी बोनसपासूनही वंचित राहावे लागणार आहे.

समाविष्ट गावांमधील कर्मचार्‍यांची वेतन निश्चिती अद्याप झालेली नसल्याने त्यांना ग्रामपंचायतीत जेवढे वेतन दिले जात होते, तेवढेच वेतन महापालिका देते. मात्र, वेतन निश्चितीनंतर सर्व फरकाची रक्कम कर्मचार्‍यांना दिली जाईल.

सचिन इथापे, उपायुक्त,
सेवकवर्ग, पुणे मनपा.

हेही वाचा

Back to top button