पुण्यातील वेल्हेत कुणबी नोंदीच्या कागदपत्रांचा खजिना | पुढारी

पुण्यातील वेल्हेत कुणबी नोंदीच्या कागदपत्रांचा खजिना

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यभरात मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. वेल्हे येथील तालुका तहसीलदार कार्यालयाच्या रेकॉर्डरूममध्ये कुणबी नोंदीच्या कागदपत्रांचा मोठा खजिना असल्याने या रेकॉर्डरूमला महत्त्व प्राप्त होणार आहे.

स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्याच्या परिसरातील गुंजन, कानंद, मोसे खोरे, मावळ व गावोगावच्या ऐतिहासिक दस्तावेजांसह बि—टिश राजवटीतील जन्म-मृत्यूच्या नोंदी, सनद, महसुली दस्तऐवज आदी कागदपत्रे वेल्हे येथील रेकॉर्डरूममध्ये आहेत. तालुकावार रचना झाल्यानंतर मोसे व इतर खोर्‍यातील काही गावांचा वेल्हे तालुक्यात, तर काही गावांचा समावेश स्वातंत्र्यानंतर मुळशी, हवेली तालुक्यात झाला. मात्र, जुनी कागदपत्रे अद्यापही वेल्हे येथील रेकॉर्डरूममध्येच आहेत.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या नजरा आता ऐतिहासिक दस्ताऐवजांसह बि—टिश राजवटीतील कागदपत्रांकडे लागल्या आहेत. शिवकालीन दस्ताऐवजांत मराठ्यांचा उल्लेख कुणबी म्हणून आहे. तर बि—टिश राजवटीत गॅझेट तसेच जन्म-मृत्यू रजिस्टर तसेच महसुली दफ्तरात कुणबी म्हणून मराठ्यांच्या नोंदी आहेत.

मराठा समाजाला कुणबी दाखले मिळण्यासाठी जुन्या कागदपत्रांची सही-शिक्क्यासह प्रती तसेच बि—टिशकालीन गॅझेटियरचे कागदपत्रे देण्यात यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबत वेल्हे तालुका तहसीलदार दिनेश पारगे म्हणाले, तहसील कार्यालयाच्या रेकॉर्डरूममध्ये बि—टिश राजवटीतील तसेच जुने दस्तऐवज आहेत. याबाबतची माहिती गोळा करण्यात येणार आहेत. जुनी कागदपत्रे जीर्ण झाली असल्याने हाताळताना काळजी घ्यावी लागणार आहे. कागदपत्रे देण्यासाठी सुरू असलेल्या गैरप्रकार थांबण्यात येणार आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

वेल्हे तहसीलच्या रेकॉर्डरूममध्ये बि—टिश राजवटीतील 1830 पासून ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्रामपंचायती अस्तित्वात येईपर्यंत गावोगावच्या जन्म- मृत्यूच्या नोंदी आहेत. या नोंदीत तसेच महसुली व बि—टिश गॅझेटमध्ये तत्कालीन मराठ्यांच्या जातीच्या पुढे कुणबी जात अशा स्पष्ट नोंदी आहेत. काही ठिकाणी/इ कु व काही ठिकाणी कुणबी/इ असा उल्लेख आहे. या कागदपत्रांच्या आधारे एकट्या वेल्हे तालुक्यात पाचशेहून अधिक मराठ्यांनी कुणबी जातीची प्रमाणपत्रे काढली आहेत. यातील अनेक जणांनी जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीपर्यंत व इतर शासकीय पदांवर इतर मागासवर्गीय राखीव पदांचा लाभ घेतला आहे.

दलालांना रोखण्याचे आव्हान

वेल्हे तालुक्यातील मराठ्यांना जुन्या नोंदींच्या आधारे कुणबी जातीचे दाखले मिळत आहेत. यासाठी शासकीय फी नाममात्र आहे. नागरी सुविधा केंद्रात ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर उपविभागीय अधिकारी सर्व कागदपत्रांची खात्री करून विनामोबदला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देतात. असे असले तरी दाखले देणार्‍या दलालांचा सुळसुळाट झाला आहे. नाममात्र शुल्कात दाखले मिळत असताना दलाल एका दाखल्यासाठी एक ते दीड लाख रुपये उकळत आहेत.

हेही वाचा

पुणे शहरात दिवाळीतील प्रदूषण देशात सर्वाधिक

नाशिक मनपा : प्रशासकीय राजवट की आणीबाणी?

Nepal Earthquake | नेपाळमधील भूकंपबळींचा आकडा १४० वर, नलगाड पालिकेच्या उपमहापौरांचाही मृत्यू

Back to top button