Pimpri News : वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; निषिद्ध वेळेतही अवजड वाहनांचा शहरात प्रवेश! | पुढारी

Pimpri News : वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; निषिद्ध वेळेतही अवजड वाहनांचा शहरात प्रवेश!

राहुल हातोले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला तीन राष्ट्रीय महामार्ग आणि एक द्रुतगती मार्गाने जोडलेले आहे. या मार्गांच्या शहरातील प्रवेश द्वाराजवळ अवजड वाहनांनी निषिद्ध वेळेत प्रवेश करू नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी त्याठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे; मात्र वाहतूक पोलिस येथे न थांबता, ही अवजड वाहने शहरात आल्यानंतर वाहतूक पोलिस त्यावर कारवाई करताना दिसून येतात. या अवजड वाहनांमुळे अपघात घडून अनेकांना आपल्या जिवास मुकावे लागले, तर अनेकांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे ही वाहने वाहतूक शाखेने ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त प्रवेश करणार नाहीत. याबाबतच्या आदेशाची अंमल बजावणी वाहतूक पोलिसांकडून होणे आवश्यक आहे.

शहरात येण्यासाठी अवजड वाहने मुंबई-पुणे, नाशिक-पुणे आणि पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचा वापर करतात. शहराच्या तळवडे, निगडी, भोसरी ओव्हरब्रिज, नाशिकफाटा, वाकड ब्रिज, सांगवी, बावधन सुसखिंड आणि देहूफाटा चौक या एंट्री पॉइंटद्वारे येतात. या ठिकाणी अनेकदा वाहतूक पोलिस उपस्थित नसल्याने ही जड वाहने शहरात प्रवेश करत आहेत.

अवजड वाहनांना या वेळात नाही प्रवेश

शहरात अवजड वाहनांना सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत शहरात येण्यास बंदी आहे.
या भागात सर्रास अवजड वाहने धावतात
हिंजवडी, वाकड, नाशिक फाटा, तळवडे, निगडी, भोसरी, सांगवी, पिंपरी, चिंचवड, आकुडी आदी भागात मोठ्या प्रमाणात अवजड वाहने निषिद्ध वेळेत धावत आहेत.

या व्यवसायासाठी धावतात अवजड वाहने

शहरात मोठमोठ्या बिल्डरांची बांधकामे सुरू आहेत. म्हणून बांधकामासाठी आवश्यक रेडीमिक्स काँक्रिटसाठी दिवसभर प्लांन्ट सुरू असतात. हा माल शहरात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वेळेत पाठवावा लागतो. त्यामुळे ही वाहने शहरात सर्रास इतरत्र धावत आहेत. तसेच औद्योगिक शहर तसेच आयटी पार्क म्हणून नावारूपाला आलेल्या या शहरात मोठमोठी व्यवसाय सुरू असल्याने विक्रीचा माल मोठ्या प्रमाणात शहरात उतरविला जातो.

वाहतूक शाखेची कारवाई मात्र, तरीही वाहनांचा प्रवेश

वाहतूक शाखेच्या वतीने सतरा दिवसांत 6178 वाहनांवर कारवाई केली. याद्वारे 61 लाख 71 रुपयांचा दंड वसूल केला. मात्र तरीदेखील ही वाहने शहरात दाखल होत आहेत. त्यामुळे शहराच्या एंट्री पॉईंटवर वाहतूक पोलिस असणे आवश्यक आहे.

शहरात पंचवीस एंट्री पॉईंटवर पोलिस ठेवण्यात येणार आहेत. कारवाई जोरात सुरू आहे. वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहनचालकांना शिस्त लावली जाणार आहे. निषिध्द वेळेत शहरात येणार्‍या वाहनांवर कारवाई केली जाईल. तसेच एंट्री पॉईंटवर पोलिस वाढविण्यात येतील.

-बापू बांगर, पोलिस उपायुक्त,
वाहतूक शाखा, पिं.चिं. शहर.

हेही वाचा

Pune News : पालिकेच्या रुग्णालयांत अनारोग्य सेवा!

कोल्हापूर : बिद्री कारखाना विनाकपात टनास ३२०० रुपये दर देणार

Nandurbar News : केळीच्या बागेत चोरी छुपे सुरु होती गांजाची शेती, पोलिसांकडून पर्दाफाश

Back to top button