

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुरंदर तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण, कँडल मार्च, निषेध मोर्चा आदी विविध मार्गांनी सरकारचे लक्ष वेधले जात आहे. त्यास गावागावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
वाल्हे येथील गांधी चौकामध्ये मंगळवारी (दि. 31) साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. या उपोषणात गिरीश पवार, अमोल खवले, अमित पवार, संदेश पवार, सत्यवान सूर्यवंशी, सतीश पवार, तानाजी पवार आदींसह इतर समाजातीलही अनेक तरुण सहभागी झाले. तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सरपंच अतुल गायकवाड, माजी सरपंच महादेव चव्हाण, सागर भुजबळ, धनंजय भुजबळ, सूर्यकांत भुजबळ, किरण कुमठेकर, बाळासाहेब भुजबळ, रणसिंह पवार, अनिल भुजबळ, हनुमंत पवार आदींनी उपोषणाला पाठिंबा देत उपोषणस्थळी हजेरी लावली.
संबंधित बातम्या :
सोमवारी (दि. 30) रात्री सुकलवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू केलेल्या लढ्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी श्रीदत्त मंदिर ते श्री भैरवनाथ मंदिरापर्यंत कँडल मार्च काढला. पिंगोरी येथील सरपंच संदीप यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. शासनाने मराठा आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तर हरणी, मांडकी, जेऊर, निरा येथेही मराठा समाजबांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.