Maratha reservation : वेहेरगाव, देहू परिसरात कडकडीत बंद | पुढारी

Maratha reservation : वेहेरगाव, देहू परिसरात कडकडीत बंद

कार्ला ; पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे पाटील आणि कार्ला फाटा येथे उपोषणास बसलेल्या तरुणांना पाठिंबा देण्यासाठी वेहेरगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. एकवीरादेवी मंदिर परिसरातील हार-फुले, दुकाने, हाटेल बंद ठेवण्यात आले होते. लोणावळा शहर ग्रामीण परिसरातील चाळीस गावांतील सकल मराठा सदस्यांचे चक्री उपोषणदेखील सुरू असून, आज चौथा दिवस आहे. लोणावळा व खंडाळा येथील सदस्यांनी चक्रीउपोषण केले.

यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते. उपोषणस्थळी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. या वेळी उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले दिले जात नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे तहसीलदार देशमुख यांना सांगितले.

किन्हई गावात उपोषणास पाठिंबा

मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी किन्हई गावकर्‍यांनी एक दिवसाचे साखळी उपोषण केले. यामध्ये मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच, सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला होता. गावातील सर्व दुकाने शंभर टक्के बंद ठेवून व्यापारी व ग्रामस्थांनी बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. देहूरोड बाजारपेठ, भाजी मंडई नेहमी सुरू होती.

देहूतील सर्व दुकाने बंद

मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याला देहूगावात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

देहूगावामध्ये कँडल मार्च

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याला राज्यभरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. शांततेच्या मार्गाने पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाज देहूच्या वतीने मशाल यात्रा व कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला एक महिन्याची मुदत दिली होती.

परंतु, या निर्धारित वेळेत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तसेच, त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याला देहूगावामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. परिसरातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवली होती. त्यामुळे बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. तसेच, सायंकाळी सात वाजता कँडल मार्च व मशाल यात्रा काढून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यामध्ये मराठाबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा 

Back to top button