Pimpri News : मराठा क्रांती मोर्चाकडून पिंपरीत सरकारचा दशक्रिया विधी | पुढारी

Pimpri News : मराठा क्रांती मोर्चाकडून पिंपरीत सरकारचा दशक्रिया विधी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सकल मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून चालढकल होत असल्याने सरकारच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून (पिंपरी-चिंचवड) मंगळवारी (दि. 31) चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराशेजारील दशक्रिया विधी घाटावर राज्य सरकारचा प्रतीकात्मक दशक्रिया विधी करून आंदोलन केले. या प्रसंगी काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून शोक व्यक्त केला. सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभर विविध ठिकाणी बेमुदत उपोषण व साखळी उपोषण सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 दिवसांत आरक्षण मागणी मान्य करतो, असे आश्वासन दिले होते. जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला व आंदोलन स्थगित केले; परंतु वेळ उलटूनही सरकारने मागणी मान्य केली नाही. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले. या आंदोलनालास सात दिवस झाले तरी सरकार निर्णय घेऊ न शकल्याने सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन केले. सतीश काळे, नाना वारे तसेच रमेश कदम यांनी मुंडन करून शोक व्यक्त केला. या प्रसंगी मीरा कदम, सुनिता शिंदे यांच्यासह उपस्थित महिला भगिनींनी आक्रोश केला.

सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल प्रकाश जाधव, मारुती भापकर, धनाजी येळकर-पाटील, कल्पना गिड्डे, राजाभाऊ गोलांडे, काशिनाथ जगताप तसेच मानव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूरज भोईर व संपत पाचुंदकर यांनी पसायदान म्हटले.
या प्रसंगी वैभव जाधव, नकुल भोईर, पांडुरंग राव, रेखा देशमुख, गणेश सरकटे, रत्नप्रभा सातपुते, अशोक सातपुते, प्रकाश बाबर, किरण खोत, संपतराव जगताप आदी उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दशक्रिया विधी घाटावर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त
तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा

Back to top button